कोल्हापूर : ‘तॉक्ते’ चक्रीवादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यत शनिवारी वादळासह जोरदार पाऊस पडला. दिवसभरात दोनतीन वेळा पावसाच्या सरी आल्या. तर सायंकाळी विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्यला झोडपून काढले.

कोकण किनाऱ्यावर ‘तॉक्ते’ चक्रीवादळ घोंगावत आहे. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी सोसाटय़ाचा वारा सुरू झाला. पाठोपाठ मुसळधार पाऊस पडू लागला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. चक्रीवादळाचा वेग मंदावे पर्यंत बाहेर पडण्याचे टाळावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे.