कोल्हापूर : नांदणी येथील जिनसेन मठातील महादेवी तथा माधुरी हत्तीच्या हस्तांतरण याचिकेबाबत उच्च अधिकार समितीकडे गुरुवारी सुनावणी होणार आहे. ही माहिती मंगळवारी मठाच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली.

नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्ती गुजरातमधील वनतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महादेवी हत्ती नांदणी मठाकडे हस्तांतर करण्याबाबत उच्चाधिकार समितीकडे सुनावणी होणार आहे. याबाबतची पुढील सुनावणी गुरुवारी (दि.२५) संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन होणार आहे.

उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्याकडून मेल मठ संस्थानच्या वकिलांना प्राप्त झाला आहे. ही सुनावणी वर्मा व सर्व सदस्य यांच्यात चर्चा होऊन निश्चित करण्यात आली आहे. याद्वारे मठाची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.