कोल्हापूर : १०० कोटींची रस्त्यांची कामे टक्केवारीसाठी थांबली आहेत का, अशा शब्दांमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्यात जाहीरपणे खडसावले असतानाही अजूनही हे रस्ते काम सुरू झालेले नाही. तर दुसरीकडे, या रस्ते कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीचे कार्यालय अंधाऱ्या अवस्थेत आणि शिकाऊ मुलांकडून सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीला आंदोलनावेळी दिसून आला. आयुक्त के. मंजू लक्ष्मी व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याची दखल घेऊन राज्य शासनाने १०० शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. लोकप्रतिनिधी – अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारामुळे हे काम रखडले आहे. काम गतीने व्हावे यासाठी नागरिक कृती समितीने २ एप्रिल रोजी प्रतिकात्मक सोटा मारो आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.

हेही वाचा : कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ८ जणांवर गुन्हा दाखल

महापालिकेचे आश्वासन हवेत

त्यांनी कृती समिती शहर अभियंता, ठेकेदार कंपनी, कन्सल्टींग कंपनी यांची संयुक्त बैठक घेऊन १ मे रोजी मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करणार व १५ मे पूर्वी अगोदरच शहरातील इतर ५ रस्त्यांचे काम दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्याचे जाहीर आश्वासन दिले पण आज १३ मे उलटून गेला तरी काहीच कार्यवाही केलेली नाही.

महापालिकेचे आश्वासन हवेत विरले, ठेकेदाराच्या कार्यालयाची दुरावस्था

रस्ते काम रखडल्याने आज कृती समितीने कामाचे ठेकेदार एवरेस्ट कंट्रक्शन कंपनीचे कार्यालय गाठले असता तेथील दैन्यावस्था दिसून आली. त्या ठिकाणी एका खोलीमध्ये एक काॅम्प्यूटर चार खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेले टॉवेल, अंडरवेअर, गाद्या, अंथरून अशा अवस्थेत त्या कंपनीचे ऑफिस होते. त्या ठिकाणी दोन शिकाऊ मुले होती त्यांनाही ऑफिस कसले आहे काहीच माहित नव्हते. त्यामुळे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. शंभर कोटीचे गौडबंगाल काय, निधी रस्ते कामासाठी की टक्केवारीसाठी, रस्ते काम बंद तरी लोक प्रतिनिधींचे तोंड बंद का? लोकप्रतिनिधी -अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार कोणते? अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा : कोल्हापूर : आवाडे समर्थक सुरज राठी याच्यावर खुनी हल्ला; दोघे अटकेत

महापालिका प्रशासनच जबाबदार

यावेळी ठेकेदार व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने हतबल झाल्याची खंत व्यक्त केली. आम्ही ताबडतोब रस्ते तयार करून द्यायला तयार आहोत. पण महापालिकेकडून रस्त्यातील जलवाहिन्या , ड्रेनेज लाईन , विद्युत लाईन , अतिक्रमणे दूर करून देण्यास महापालिकेकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आम्ही हातबल झालो आहोत. यात आमचा काही दोष नाही, असे मुल्ला यांनी सांगितले. त्यावर कृती समितीने २० मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : कोल्हापूर: मोटार घळीत कोसळली; महिलेचा मृत्यू, ४ महिलांसह ५ मुले जखमी

आंदोलनात अशोक पोवार , रमेश मोरे , शामराव जोशी , गजानन यादव , प्रकाश चुयेकर , सदानंद सुर्वे, किशोरी यादव , प्रकाश आमते , चंद्रकांत चिले, संभाजी जगदाळे, बाबासाहेब लबेकरी , वसंतराव मुळीक, प्रसाद बुलबुले , कादरभाई मलबारी , शंकरराव शेळके , महादेव जाधव, राजेंद्र कुरणे ,महादेव पाटील , फिरोज खान , अमृत शिंदे, सुरेश कदम , राजाभाऊ मालेकर ,विलास मुळे , राजाराम कांबळे, प्रसाद जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur agitation due to road works of rupees 100 crores stopped css