कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी माझ्यासमोर आव्हानात्मक परिस्थीती निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्धी समोर आल्याने सरळ सामना होणार आहे. कोणाला आव्हान म्हणून नव्हे तर ‘वारणा कुटुंब‘ म्हणून सामोरे जाताना वारणाची विश्वासाहर्ता दाखवून देताना धैर्यशील माने यांना विजयी करा, असे आवाहन वारणा समूहाचे प्रमुख, जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केले. सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा समूहाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी रात्री झाला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा : हातकणंगलेतील बहुरंगी लढतीला धार

ते म्हणाले, शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा कार्यक्षेत्रातल्या सागांव पासून शिगांव पर्यंतच्या गावांत तीस वर्षांत कधीही पक्षीय राजकारण केलं नाही किंवा जनसुराज्यशक्ती पक्ष काढूनही आणले नाही. सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्यापासून वारणा समूहात टोकाचा संघर्ष होता. त्यांनंतरच्या काळात या दोन तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी व गटांनी वारणेला कायम मदतच केली. त्यामुळे पुन्हा संघर्ष नको म्हणून गेल्या तीस वर्षांत शिराळा आणि वाळवा तालुक्यात जाणीवपूर्वक कधीही पक्षीय राजकारण आणले नाही. खरे तर मलाच उमेदवारीचा आग्रह करण्यात आला होता. मात्र आपल्याला राज्यात काम करायचं असल्याने नकार दिला. असे सांगून तीस वर्षांपुर्वी वारणा समूहाविरोधात टोकाचा संघर्ष झाला होता. मात्र त्यानंतर संघर्ष संपला आणि सर्वांनी मदत केली. त्यामुळे पक्षाची स्थापना करुनही हक्कांच्या गावांत कधीही पक्षीय राजकारण केले नाही. मात्र आज नाइलाजाने वारणा कुटुंबाला विरोध करणारा प्रतिस्पर्धी समोर आल्याने सर्वांनी आपापल्या पक्षातील नेत्यांना नम्रपणे सांगून यावेळेस वारणा बरोबर राहणार असल्याचे सांगा व कामाला लागण्याचे आदेश देत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या हक्काचा उमेदवार संसदेत पाठवूया व वारणा कुटुंब म्हणून काय ताकद असते ते दाखवून देवूया असे आवाहन केले.

हेही वाचा : लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक शेतकरी हिताचे निर्णय झाले. याचा उहापोह करत कोरोना काळात व त्यानंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली मात्र आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारली त्यामुळे देशभक्ती आणि प्रेमासाठी या निवडणुकीकडे पाहून राजकीय पटलावर वारणाने घेतलेला निर्णय हा जनतेचा निर्णय असल्याचे सार्थ करुया त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.