कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असताना रोजच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टीकाटिपणी सुरू आहे. आज या मुद्द्यावरून कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील हे सतत मला प्रश्न विचारत आहेत. ते लोकसभेचे उमेदवार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. तर, काठीची भाषा वापरणे हे सतेज पाटील यांच्या कोणत्या संस्कृतीत बसते? अशी विचारणा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या शनिवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानात सायंकाळी सभा होणार असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. महायुतीच्या वतीने कोल्हापुरात संजय मंडलिक व हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन दिवस महायुतीचे नेते सभा यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. सभास्थळी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सभेच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. महापालिकेची यंत्रणा स्वच्छता, रस्त्यांचे पॅचवर्क या कामांमध्ये गुंतली असून ११ अधिकारी तयारीवर नजर ठेवून आहेत. सभेच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदींनी तयारीची पाहणी केली.

हेही वाचा – उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

ते उमेदवार आहेत का?

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले. मी एका पक्षाचा उमेदवार आहे तर शाहू महाराज हे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत. उमेदवारी या नात्याने मला जे बोलावे लागते ते बोलणे भाग आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावर खासदारांनी बोलावे असे म्हणण्याचा सतेज पाटील यांना अधिकार काय, त्यांना प्रश्न विचारायचे होते तर निवडणुकीचा अर्ज का भरला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – देशातील लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात; बाळासाहेब थोरात यांची टीका

त्यांची काठीची भाषा कशासाठी?

तर यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर टीका केली. महाडिक म्हणाले , महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे सर्वांचे आदरस्थान आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीला उभे केल्याचा पश्चाताप सतेज पाटील यांना होत आहे. त्यामुळे ते विनाकारण वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांचा भाषेवरील संयम सुटला आहे. कोल्हापुरातील वातावरण शांत असतानाही लाठीकाठी वापरण्याची सतेज पाटील यांची भाषा त्यांच्या संस्कृतीत नेमकी कोठे बसते? कोल्हापुरात पराभव समोर दिसू लागला असल्याने ते अशी विधाने करत आहेत, अशी टीका महाडिक यांनी केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is satej patil a candidate ask sanjay mandlik ssb