कोल्हापूर : कोल्हापूर शहरात काल बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर आज कागल शहर परिसरात चार गव्यांचा कळप आढळला. पहाटेच्या दरम्यान गव्याचा कळप शेतातून निघून गेला. जाताना उभ्या पिकांचे नुकसान केल्याचे आढळले आहे. पायांच्या ठशावरून हे गवेच असावेत, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.कोल्हापूर शहरातील ताराराणी पार्क या मध्यवर्ती भागात काल बिबट्या मनसोक्त फिरताना आढळला होता. बिबट्याने हल्ला करून तिघांना जखमी केले होते. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर आज कागल परिसरात गव्यांचा कळप आढळल्याने त्याची चर्चा होत आहे.
कागल येथील अनंत रोटो या सूतगिरणी परिसराच्या पश्चिम भागात संदीप माळी यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याजवळ पहाटे कुत्री सतत भुंकू लागल्याने ते बाहेर आले. त्यांना चार गवे दिसून आले. अंधार असल्याने त्यांना ते गवे आहेत हे नीटपणे ओळखता आले नाही.दरम्यान, शेतकरी वीरकुमार पाटील यांना पहाटे ही माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
गव्यांनी खापरे, चौगुले मळा परिसर पार करत लक्षापतीच्या रानापासून नदीकडे वाट धरल्याचे नागरिक सांगतात. सुमारे एक किलोमीटरपर्यंत त्यांच्या पायाचे ठसे दिसून आले असून परिसरातील अनेक शेतांमध्ये पिकांची हानी झाली आहे. दरम्यान घरी आल्याची फक्त चर्चाच ऐकायला मिळाली व त्याच्या पायाचे ठसे बघायला मिळाले, मात्र गवे कुणालाही दिवसभरात दिसलेले नाहीत. गव्यांचा वावर वाढला गेल्या तीन वर्षांपासून या परिसरात दरवर्षी गवे दिसत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने व पोलीस प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोल्हापुरातही डिसेंबर २०२२ मध्ये रमणमळा परिसरातील गव्यांच्या कळपाने उसाच्या फडाच्या शेतीत तळ ठोकलेला दिसून आला होता. एका शेतात गव्यांचा कळप गेल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर वनविभागाचे गस्त पथक तैनात करण्यात आले होते. खबरदारीचा भाग म्हणून अग्निशामक दल व पोलिसांच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. तर त्या आधी, सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात आजरा तालुक्यात एका महिला गव्याच्या तावडीतून थोडक्यात बचावली होती.
