भरपूर वाचन करा त्या आधारे चिंतन मनन करा पण ‘ध’ चा ‘मा’ करू नका, अशी उपरोधित टिपणी उच्च व शिक्षणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी केली. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मंत्री पाटील शाईफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर आज मंत्री पाटील यांनी केलेली ही टिपणी लक्षवेधी ठरली.

वाचन संस्कृती टिकण्यासाठी, रुजण्यासाठी निशुल्क फिरत्या वाचनालयाचा उपक्रम पुण्यात यशस्वी झाल्यानंतर आज मंत्री पाटील यांच्या हस्ते दसरा चौक येथे फिरत्या वाचनालयाच्या गाडीचे लोकापर्ण करण्यात आले. आजच्या कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने पोलीस अधिक आणि वाचक, रसिक कमी असे वेगळे चित्र होते.

हेही वाचा >>> ‘गोकुळ’चे चार प्रकारचे सुगंधित दूध ग्राहकांच्या सेवेत

पुस्तकांचा खजिना

फिरत्या वाचनालयात सुमारे सहा हजार पुस्तके आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तके याचबरोबर कथा, कादंबरी, अध्यात्म, इतिहास, बालसाहित्य, निसर्ग इत्यादी विषयांच्या पुस्तकांचा खजिना वाचकांना उपलब्ध होणार आहे. शहरातील विविध ठिकाणी नियोजित वेळेत गाडी थांबून वाचकांना सेवा देण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून शालेय मुलांसाठीही फिरते वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.

म्हणून निवडणुका जिंकतो

आज मंत्री पाटील यांचा भर वाचनालय, वाचन यावर होता. त्यातूनही त्यांनी अध्ये मध्ये राजकीय विषयावर भाष्य केले. भाजप लोकांसाठी विविध उपक्रम राबवतो. सतत काम करतो. याचमुळे पक्षाला गुजरातमध्ये १५६ जागा मिळाल्या. हे रहस्य विरोधकांनी लक्षात घ्यावे. राज्यात सध्या सुरू असलेल्या प्रकारांना उत्तर देण्यासाठी सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.