कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधी लढा व्यापक करण्याचा आणि त्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यव्यापी बांधा ते वर्धा संघर्षयात्रा सुरू करण्याचा निर्णय येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
राज्य शासनाच्या प्रस्तावित नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाच्या सद्य:स्थितीवर चर्चा आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी १२ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी आणि संघर्ष समितीची बैठक पार पडली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, मुंबईतील मोर्चानंतर शक्तिपीठ महामार्ग बाधित सर्व १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी संघर्षांची भूमिका घेतली आहे. समृद्धी महामार्ग उपलब्ध असताना शक्तिपीठ महामार्गाची गरजच नाही. एका महामार्गासाठी कर्ज काढून ८६ हजार कोटी रुपये देण्याऐवजी या मार्गातील देवस्थानांना प्रत्येकी एक हजार कोटींचा निधी देऊन त्यांचा विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. महामार्गासाठी बांधण्यात येणारे पूल, टाकला जाणारा भराव यामुळे महापुराची समस्या अक्राळविक्राळ होण्याची भीती व्यक्त केली. आमदार कैलास पाटील यांनी शक्तिपीठच्या विरोधात प्रत्येक गावांनी ग्रामसभेत ठरावा करावा, अशी सूचना मांडली. चर्चेत आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार वैभव नाईक, अखिल भारतीय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे आदींनी भाग घेतला.