कोल्हापूर : कोल्हापूरचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान व प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची, कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव अधिक उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी येथे केले.
शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यावर एक बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना विचारात घेऊन जन्मस्थळ कामांची दिशा ठरवली जाईल.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी जोखून काम केले. त्यामुळेच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची पालखी वाहतो, अशा शब्दांत गौरवोद्गार काढत अभिवादन केले.