कोल्हापूर : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित असल्यावरून सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. सध्या सुरू असलेली कामे ३१ जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण, दर्जेदार झाली नाहीत तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अन्य अधिकारी, प्रताप माने उपस्थित होते.
महामार्ग रस्त्यांची चाळण
यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने सातारा-कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर तोफ डागून मंत्री मुश्रीफ म्हणाले, या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल.
काळ्या यादीचे काय झाले?
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात झालेल्या याच कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी, सातारा ते कागल महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम रखडले आहे. या कामाची प्रगती १५ सप्टेंबरपर्यंत दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावेत, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. या महामार्गाचे काम जलदगतीने करून कामाची प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. त्यामुळे कंत्राटदारास काळ्या यादी टाकण्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न आजच्या बैठकीनंतर उपस्थित झाला.
यावेळी मुश्रीफ यांनी मौजे बेलेवाडी मासा येथील महार वतन जमीन संपादन, गडहिंग्लज वडरगे रोड येथे नव्याने विकसित होणारे क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड, आंबे – ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसनाबाबत प्रलंबित विषय, पदवीधर मतदार नोंदणीबाबत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाडेवाढ संदर्भात किरकोळ किराणा दुकानदार/ व्यापाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा घेतला.
या आढावा बैठकीसाठी मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस, माजी आमदार संजय घाटगे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी देवानंद ढेकळे, शिवराज नाईकवाडे, वनविभागाचे धैर्यशील पाटील, विलास काळे, सचिन सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
