कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी करण्याबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
या विषयाबाबत मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी मंजूर झाली आहे. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी पाहता, अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या पाच गावातील सुमारे ३५० हेक्टर जागा उपलब्ध आहे. ही जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनीही सकारात्मकता दर्शवली असल्याचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरे यांनी मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे या ठिकाणी आयटी पार्क, चर्म उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग अशा विविध उद्योगांची निर्मिती होऊ शकते. यामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचा मार्ग खुला होईल, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीची मागणी केली होती. त्यांनी या भागातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी औद्योगिक विकासाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगान, सहायक व्यवस्थापक डॉ. विनय राठोड, डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, किरण जाधव, संतोष भिंगे व उमेश देशमुख, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर) आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उद्योगमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीचा निर्णय अंतिम झाला, तर हा भाग औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणार असून, स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. यामुळे शाहूवाडी तालुक्यात औद्योगिक विकासाचा नवा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अडीच वर्षांपूर्वी मंजुरी
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व सांगली जिल्ह्यातील आष्टा या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याला मार्च २०२३ मध्ये उद्योग विभागाने तत्वत: मान्यता दिली होती. तसेच, मजले येथे नियोजित ‘ड्राय पोर्ट’साठी लागणारी जमीन एमआयडीसी मार्फत महामार्ग प्राधिकरणला हस्तांतरीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली होती.