कोल्हापूर : ज्याची भूमिका सत्याची आहे ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. आज ईडीची नोटीस अनेकांना दिली जाते. कारवाई होणार म्हटल्यावर काहींनी भूमिका बदलली आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना उद्देशून येथे लगावला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा शुक्रवारी रात्री येथील दसरा मैदानात झाली. यावेळी सध्याची बहुचर्चित ईडीची कारवाई आणि त्याचे राजकीय परिणाम यावर भाष्य केले. ते म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर खटला दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मी कृषीमंत्री असताना…”

नवाब मलिक हे केंद्र सरकारवर टीका करत असल्याने त्यांनाही तुरुंगात डांबले गेले.निवडणुकीच्या आधी मला ही ईडीची नोटीस आली होती. त्यात उद्या या म्हंटले असताना मी आताच येतो म्हणुन निघालो. मात्र पोलिसांनी घरी येऊन हात जोडून तुम्ही येऊ नका म्हणून विनंती केली. आरोप ठेवलेल्या बँकेतून मी कधी कर्ज घेतले नव्हते. केवळ भीती घालण्याचा प्रयत्न केला होता. ज्याची भूमिका सत्याची आहे ते घाबरत नाहीत.  कोल्हापूर हे शूरांचे शहर आहे. त्यामुळे येथे अशी ईडीची नोटीस आली तर हे लोक सामोरे जायची ताकद दाखवतील असे माझ्यासारख्या माणसाला वाटले होते. परंतु, इथे काहीतरी वेगळंच घडले. कोल्हापुरात कोणाला तरी नोटीस आली, कोणाच्या तरी घरी सीबीआयचे लोक गेले,  प्राप्तिकर विभागाचे लोक गेले. मला वाटले की, इतकी वर्ष आमच्याबरोबर काम केलेले हे लोक आहेत, यांच्याकडे काहीतरी स्वाभिमान असेल. परंतु, तसं काही घडलं नाही. उलट यांच्या घरातल्या महिलांनी ईडीला आणि सरकारला सांगितलं, तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, धाडी टाकताय, यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला. त्या कुटुंबप्रमुखाने घरातल्या महिलांसारखं धाडस दाखवले नाही. त्याऐवजी, त्याला वाटलं आपण ईडीच्या दरवाजात जाऊन बसू, भाजपात जाऊ, मग ते म्हणतील तिथं बसू आणि यातून आपली सुटका करून घेऊ. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली, असा टोला पवार यांनी हसन मुश्रीफ यांना उद्देशून लगावला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar slams those leader who left party over ed fear zws