महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना केलं होतं. या विधानानंतर आता विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत मविआ सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

“पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीदरम्यान बऱ्याच सभा घेतल्या आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी जवळपास २० सभा घेतल्या. त्यांना आता कळून चुकलं आहे, की आपण यंदा निवडून येऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक सभेतील विधानं आणि त्यातील विसंगती बघितल्या, तर मला वाटतं की मोदींना आता थोडी विश्रांतीची गरज आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे”, अशी खोचक टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

“या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी धार्मिक आधारावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. निवडून येण्याकरिता वाट्टेल ते करण्याची मोदी आणि भाजपाची तयारी आहे. खरं तर मोदींना आता बोलायला काही मिळालं नसल्याने त्यांनी गांधींवर राग काढला आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“पंतप्रधान मोदी यांचे शिक्षण बेताचं झालं आहे किंवा त्यांचे शिक्षण झालेलं नाही, असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे, याची त्यांना जाणीव नाही. खर तरं सिनेमा बघूनच त्यांची आणि महात्मा गांधींची ओळख झाली असावी आणि ते सिनेमा बघून खूप प्रभावित झाले असावे, त्यामुळे जग महत्मा गांधींना सिनेमा बघून ओळखू लागले, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच अशी व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, हे आपलं दुर्देवं आहे”, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी बोलताना, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – विधानसभेनंतर मविआचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला फार्म्युला

याशिवाय “जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे.” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan criticized pm narendra modi over statement on mahatma gandhi spb
Show comments