यंदाचा ऊस गळीत हंगाम महिनाभर उशिरा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना उधळून लावणार आहे. १ नोव्हेंबरला कारखाने सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी रस्त्यावर उतरून लढणार असल्याचे येथे स्पष्ट केले. शेट्टी यांच्या या घरच्या आहेराने शासनाची अडचण होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील ऊस गळीत हंगाम महिनाभर उशिरा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा आहे. ज्यामुळे मूठभर साठेबाज साखर कारखानदारांचे हित साधले जाईल. या निर्णयाने कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी शासनाचा १ डिसेंबरला ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना उधळून लावेल. प्रसंगी रस्त्यावरील लढाई केली जाईल, असा इशारा शेट्टी यांनी  पत्रकारांशी बोलताना दिला.

राज्य शासन अजित पवार, हर्षवर्धन पाटील या माजी मंत्र्यांच्या थापेबाजीला भुलून शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेत आहे, पण शासनाला वठणीवर कसे आणायचे हे संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलेच माहीत आहे. यापूर्वी अनेक आंदोलने यशस्वी करीत शासनाला आम्ही वठणीवर आणले असल्याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.

ऊस परिषदेमुळे साखर कारखान्यांचा हंगाम उशिरा सुरू होतो अशी टीका केली जाते. यंदा उसाची कमी असल्याने कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात सुरू व्हावेत यासाठी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतली आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.