कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक-सामाजिक जाणिवेच्या भावनेतून लोकस्मृती वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम गतीने पूर्ण केले आहे. पुढील टप्प्यासाठी आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी केली.शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी यापूर्वी लोकस्मृती वसतिगृह योजनेसाठी २५ लाख रुपयांचा निधी प्रदान केला आहे.
ठाकूर म्हणाले, लोकस्मृती वसतिगृहाच्या इमारतीची ध्वनीचित्रफीत पाहूनच हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने झाल्याचे लक्षात येते. यामागे विद्यापीठाची विद्यार्थिनींप्रती मोठी उदात्त भावना आहे, याची प्रचिती येते. इमारत अतिशय सुंदर झाली असून येथे विद्यार्थिनींची उत्तम निवासव्यवस्था होईल. या पर्यावरणात त्यांचा अभ्यासही चांगला होईल. आपल्या स्नेहीजनांप्रती, त्यांच्या स्मृतींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने दात्यांना मिळाली. पुढील टप्प्याचे कामही लोकांच्या दातृत्वातून सहजपणे मार्गी लागेल. या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी म्हणून या इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी देऊन माझा मोठा सन्मान केला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. त्यांच्या निवासव्यवस्थेचा विस्तार करण्याच्या आवश्यकतेतून विद्यापीठाने स्वनिधीतून सुविधा विकास केला. तथापि, समाजातील दात्यांच्या माध्यमातून लोकस्मृती वसतिगृह उभारण्याचे ठरविल्यानंतर देणगीदारांचा लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यामध्ये व्यक्ती, शिक्षक, संस्था यांचा सहभाग राहिला. त्यातून प्रशस्त आणि सुसज्ज दुमजली इमारत उभी राहिली. रामशेठ ठाकूर यांनीही भरीव मदत केली. अशा सहृदयी दात्यांमुळे पुढील टप्पाही यशस्वीरित्या मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भावनांचा कल्लोळ
लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाची संकल्पना ही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची. त्यासाठी आई शारदा यांच्या नावे त्यांनी देणगी दिली. या कक्षाची पाहणी करताना त्यांनी आईंच्या आठवणींना उजाळा दिला. आई विमल यांच्या स्मृत्यर्थ देणगी दिलेल्या डॉ. भारती पाटील यांचा आईविषयी बोलताना कंठ दाटून आला. पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावे सर्व जमापुंजी दान केलेल्या भालचंद्र जोशी यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.
देणगी दारांचा सत्कार
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते उपस्थित देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. भारती पाटील, भालचंद्र दिगंबर जोशी, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. गिरीजा कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत लंगरे, विलो मॅथर कंपनीचे विजयानंद सोनटक्के यांचा समावेश होता. याखेरीज इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईनचे काम करणारे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रा. महेश साळुंखे, डॉ. पुनश्री फडणीस, अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, रणजीत पवार, बांधकाम ठेकेदार युवराज गोजारी, बांधकाम ठेकेदार धनंजय मुळीक व विद्युत ठेकेदार अमोल इलेक्ट्रीकल्स् यांचाही सत्कार करण्यात आला. बेंगलोरचे आर्किटेक्ट कारेकर अँड असोसिएट्स यांनी या कामाचे वेगळेपण लक्षात घेता सदर इमारतीचे आर्किटेक्चरल काम पूणतः मोफत केल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.