कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही पुत्र असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आमचाच हक्क आहे. इतरांनी ती कोणी लावू नये असे कोणाला म्हणता येणार नाही. राजेशाही आता संपली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,की राज्यातील सत्ताबदल होण्यामध्ये भाजपचा कसलाही हात नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी बंडखोरी केली असेही म्हणता येणार नाही. खरे पाहता २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनादेश हा भाजप -शिवसेनेच्या बाजूने होता. परंतु दगाफटका झाला. असंगाशी संग करून काँग्रेस -राष्ट्रवादीशी आघाडी केली गेली. ते जनतेला पसंत नव्हते. आमदारांवर अन्याय झाला होता. त्यामुळे त्यांनी आपला वेगळा नेता निवडला आहे.
आता बातम्यांमधून असे दिसते, की आमच्या वडिलांची प्रतिमा कोणी लावू नये असे म्हटले जात आहे. शिवसेनेवर आमचाच अधिकार आहे असे सांगितले जात आहे. तथापि एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की शिवसेनाप्रमुख हे आमचे दैवत होते. आमच्या दृष्टीने ते राज्याचे राजे होते. आता राजाचा मुलगा राजा होईलच असे नाही. आता पोटातून आल्याने नाही तर पेटीतून आल्याने वारसा ठरतो. त्यामुळे त्यांच्या पोटी मी जन्मलो म्हणून मी राजा, असे कोणाला म्हणता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
