कोल्हापूर : कोल्हापुरात आज विजयादशमीचा सण जोशात साजरा केला जाणार आहे. दसरा चौकात परंपरेनुसार सायंकाळी शाही दसरा साजरा केला जाणार असून तयारी पूर्ण होत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील म्हैसुर पाठोपाठ सर्वांत लोकप्रिय दसरा म्हणजे कोल्हापूरचा शाही दसरा होय. गेल्या कित्येक वर्षांपासून याची परंपरा कोल्हापूरनेही तितक्याच उत्साहात जपली आहे. यंदाही जिल्हा प्रशासनाने गुरुवार ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारीवरून महायुतीतील वाद काटेरी वळणावर

शुक्रवारी मध्यरात्री अष्टमीचा जागर झाल्यानंतर शनिवारी सकाळी नवमीची तिथी, खंडेनवमीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची पालखी सायंकाळी ६ पर्यंत दसरा चौकात येईल. या ठिकाणी मेबॅक गाडीतून छत्रपती घराण्यातील मान्यवर शमी पूजनासाठी उपस्थित राहतील. छत्रपती घराण्याचे मानकरी, प्रशासनातील प्रमुख अधिकारी, संस्थानकालीन लवाजमा यासह कोल्हापूरकर या उत्सवात सहभागी होतील. जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवर या सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत. गेले दोन दिवस दसरा मैदानात सोहळ्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा – नृसिंहवाडीत वयस्कर भाविकांसाठी दर्शन सुलभ; पायरीची उंची सोयीस्कर

आज सराफ बाजार सुरू

दरम्यान, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला सोने-चांदी अशा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची जुनी परंपरा आजही टिकून आहे. नेहमी सराफ बाजार शनिवारी बंद असतो. पण आज दसऱ्यानिमित्त ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजार सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहन, घरगुती उपकरणे, स्थावर मालमत्ता या बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijayadashami celebration in kolhapur today charm of shahi dussehra ssb