कोल्हापूर : राजकारणातील अपयशाने कधी खचलो नाही की निराधार झालो नाही, लोकांची साथ मिळत गेली. अपयश आल्यामुळे मी एकटा पडलो, असे कधी जाहीरपणे आम्ही सांगितले नाही. गाव सोडून गेलो नाही की टीव्ही फोडला नाही, असा खोचक टोला खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी लगावला.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज दौऱ्यात राजकारणात मी एकटा पडलो आहे; जनतेने साथ द्यावी, अशी साद घातली होती. त्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता खासदार महाडिक म्हणाले, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण राजकारण हे कालचक्रासारखे असते. चढ-उतार येत असतात. आमच्याही राजकीय वाटचालीत अनेक चढ-उतार आले, अपयश आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझा घात झाला. विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळमधील सत्ता गेली. पण आता ही सर्वच सत्तास्थाने, पदे पुन्हा मिळालेली आहेत. आगामी विधान परिषदेत निवडणुकीत भाजपचा आमदार होईल तर गोकुळमध्ये सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यात अजितदादा राष्ट्रवादी व शिंदेसेनेप्रमाणे भाजपमध्येही अनेकजण प्रवेशाच्या मार्गावर आहेत. भाजपमध्ये आधीच मोठी गर्दी झाली असल्याने नवीन कोणी येत असताना त्या प्रभागामधील भाजपचा कार्यकर्ता दुखावणार नाही, याची काळजी घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, किसान सेलचे भगवान काटे उपस्थित होते.