Asia Cup 2025 Abhishek Sharma statement After POTM Award: भारताने सुपर फोर टप्प्यातही पाकिस्तानवर विजय मिळवत चांगली सुरूवात केली आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्माच्या भागीदारीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर तिलक वर्माने त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यादरम्यान अभिषेक-गिल यांचं पाकिस्तानच्या गोलंदाजांबरोबर मैदानात बाचाबाची झाली. त्याविषयी बोलताना अभिषेकने सामन्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभूत केला आणि ७४ धावांची वादळी खेळी करणारा अभिषेक शर्मा या विजयाचा नायक ठरला. भारताकडून अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह सर्वाधिक ७४ धावा केल्या. शुबमन गिलनेही २८ चेंडूत ८ चौकारांसह ४७ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा विजय निश्चित केला.

अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाबरोबर झालेल्या वादावर काय म्हणाला?

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजी करत असताना पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर शाहीन आफ्रीदीबरोबर वाद झाला. अभिषेकने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. त्यानंतर आफ्रिदी त्याला काहीतरी म्हणाला आणि वाद सुरू झाला. हा वाद त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकात कायम राहिला. तर थोड्या वेळाने हारिस रौफबरोबरही वाद पेटला.

सामनावीर ठरलेल्या अभिषेक शर्माने यावर सामन्यानंतर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “आज माझ्यासाठी खूप सोपं होतं. कोणत्याही कारणाशिवाय ते ज्या पद्धतीने आमच्याशी बोलत होते, वागत होते ते मला अजिबात आवडलं नाही. त्यांना उत्तर द्यायचा एकमेव मार्ग म्हणजे आक्रमक फलंदाजी. तेच मी केलं.”

शुबमन गिलबरोबर भागीदारीबाबत अभिषेक म्हणाला, “मी शुबमनबरोबर शाळेपासून क्रिकेट खेळतो आहे आणि त्याच्याबरोबर अशी मॅचविनिंग भागीदारी करण्याची मी खूप दिवसांपासून वाट बघत होतो. संघासाठी मी ज्या पद्धतीनं फलंदाजी करतो, ते महत्त्वाचं आहे. माझ्या खेळात जो आक्रमकपणा आहे, तो संघाच्या पाठिंब्यामुळे शक्य होतो. त्यांना माहिती आहे की हा हाय-रिस्क खेळ आहे, पण नेहमीच यातून अपेक्षित यश हाती येईल असं नसतं.”

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने उत्कृष्ट फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या विकेटसाठी भारताच्या सलामीवीरांनी १०० धावांची भागीदारी केली. यानंतर तिलक वर्माने भारताचा डाव सावरला आणि १९ चेंडूत ३० धावांची खेळी करत भारताला १८.५ षटकांता विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.