Abhishek Sharmas X Profile Suspend: आशिया चषकात भारतीय क्रिकेट संघाने दोन वेळा पाकिस्तानी संघाचा लाजिरवाणा पराभव केला. रविवारी (२१ सप्टेंबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर गरमागरमी पाहायला मिळाली. भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच ठोकून काढले. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आता अभिषेक शर्माच्या सोशल मीडिया हँडल्सना लक्ष्य केले आहे. नुकतेच अभिषेक शर्माचे एक्स अकाऊंट सस्पेंड झाले आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी तडाखेबंद १०५ धावांची सलामी दिली. गिलने २८ चेंडूत ८ चौकारांसह ४७ धावांची खेळी केली. तर अभिषेकने मैदानभर फटके लगावत ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.

दरम्यान भारताचे दोन्ही सलामीवीर पाकिस्तानी गोलंदाजांची हवा काढत असताना वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी दोन्ही फलंदाजांना डिवचले. त्यामुळे मैदानात काही काळ तणावाची परिस्थिती होती. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी खेळ दाखविण्यापेक्षा आक्षेपार्ह हातवारे आणि बडबड करून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे हसू करून घेतले.

दरम्यान सामना झाल्यानंतर अभिषेक शर्माने त्याच्या एक्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले होते. ‘तुम्ही बोलत रहा, आम्ही जिंकू’ (You Talk, We Win) अशी पोस्ट शेअर केली. ही टीका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. अभिषेक शर्माला मैदानात रोखण्यात त्यांचे गोलंदाज अपयशी झाल्यानंतर पाकिस्तानचे ट्रोलर्स अभिषेक शर्माच्या एक्स प्रोपाइलवर तुटून पडले. त्याचे अकाऊंट रिपोर्ट केले गेल्यामुळे आता ते सस्पेंड झाले आहे.

अर्थात एक्स प्रोफाईल सस्पेंड केले असले तरी अभिषेकचा खेळावर त्याचा काही परिणाम होईल, असे दिसत नाही. सामान्यपणे अकाऊंट रिपोर्ट केल्यानंतर एक्सकडून काही काळ प्रोफाईल सस्पेंड केले जाते, हे सामन्य प्रक्रिया आहे. काही वेळाने ते पूर्ववत होते. मात्र यातून पाकिस्तानी चाहत्यांची वृत्ती दिसून येत असल्याची टीका आता सोशल मीडियावर होत आहे.

आशिया चषकात अभिषेक शर्माची बॅट तळपली

आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्माने पाच सामन्यात सर्वाधिक २४८ धावा केल्या असून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या खालोखाल बांगलादेशचा सैफ हसन (१६०) आणि तिसऱ्या क्रमाकांवर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (१५६) आहे.