Rohit Sharma said that he failed to play as a team : भारत आणि इंग्लंड संघांत कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लिश संघाने भारताच्या दोन दिवसांतील मेहनतीवर एका दिवसात पाणी फेरले. पाहुण्यांनी चौथ्या दिवशीच रोहित शर्मा अँड कंपनीकडून विजय हिसकावून घेतला. मात्र चौथ्या दिवसअखेरीस स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी इंग्लंडचा श्वास रोखून धरला होता. पण शेवटी मोहम्मद सिराजच्या विकेटनंतर भारतीय संघाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी तग धरुन पाचव्या दिवसापर्यंत खेळावे अशी आपली इच्छा असल्याचे त्याने स्पष्ट केले. तो सामना संपल्यानंतर म्हणाला, “चूक कुठे झाली हे सांगणे कठीण आहे. १९० धावांची आघाडी मिळाल्यानंतर आम्ही सामन्यात खूप पुढे आहोत असे वाटले. मात्र ऑली पोपने चमकदार फलंदाजी केली. भारतीय परिस्थितीत परदेशी फलंदाजांकडून आपण पाहिलेल्या सर्वोत्तम खेळीपैकी पोपची एक आहे.”

“एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो” –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “आम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. मात्र एकूणच, एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. बुमराह आणि सिराजने पाचव्या दिवसापर्यंत सामना घेऊन जावाव, अशी माझी इच्छा होती. खालच्या फळीतील फलंदाजांनी शेवटी तिथे खरोखरच चांगली लढत दिली.”

हेही वाचा – AUS vs WI : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने वेस्ट इंडिजच्या क्षमतेवर उपस्थित केले होते प्रश्न, क्रेग ब्रॅथवेटने दंड दाखवत दिले प्रत्युत्तर

सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार बेन स्टोक्सच्या ७० धावांमुळे संघाला २४६ धावा करण्यात यश आले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ८० धावांचे, लोकेश राहुलने ८६ धावांचे आणि रवींद्र जडेजाने ८७ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जो रूटने चार तर हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉम हार्टलीसमोर टेकले गुडघे, इंग्लंडचा भारतावर २८ धावांनी दणदणीत विजय

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑली पोपने १९६ आणि बेन डकेटने ४७ धावा केल्या. भारताच्या बुमराहने चार आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडचा संघ ४२० धावा करण्यात यशस्वी ठरला आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. अश्विन आणि भरत यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. इंग्लंडच्या टॉम हार्टलीने सात विकेट घेत संघाच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the first test defeat against england rohit sharma said that he failed to play as a team vbm
First published on: 28-01-2024 at 20:01 IST