करोना विषाणूने सध्या सर्व जगभरात थैमान घातलं आहे. भारतासह महाराष्ट्रातही या विषाणूचे अनेक रुग्ण सापडले आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून…या काळात सर्व क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आलेल्या आहेत. या काळात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवणत आहे. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही मुंबईत आपल्या घरीच आहे.
अजिंक्यची पत्नी राधिकाने आपल्या मुलीचा एक गोंडस व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अजिंक्य आपली मुलगी आर्याला, आता घराबाहेर पडायचं?? असा प्रश्न विचारतो…ज्यावर लहानग्या आर्याने नकारार्थी मान डोलावली. पाहा हा व्हिडीओ…
राधिकाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. अजिंक्यनेही या खडतर काळात आपलं सामाजिक भान राखत मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत केली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात अजिंक्य जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलीसोबत असतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजिंक्यने आपल्या दिनक्रमाबद्दल खुलासा केला होता.
