Why Shreyas Iyer Not Picked in India Asia Cup Squad: आशिया चषक २०२५ साठी अखेरीस भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मुंबईत निवड समितीची बैठक झाली, जिथे १५ खेळाडूंची निवड करण्यात आली. मोठी गोष्ट म्हणजे शुबमन गिल देखील आशिया चषक टी-२० संघाचा भाग असणार आहे. त्याच्याकडे उपकर्णधार देण्यात आले आहे. दरम्यान टी-२० संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड का केली नाही, याचं उत्तर अजित आगरकरांनी दिलं आहे.

आशिया चषक २०२५ साठी सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुबमन गिल उपकर्णधार आहे. गिलला टी-२० संघात संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू होती. पण तो श्रीलंका टी-२० मालिकेत शुबमन गिल उपकर्णधार होता, म्हणूनच त्याला संघात ठेवण्यात आलं आहे. टी-२० संघात यष्टीरक्षक जितेश शर्मा परतला आहे. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी उत्तम कामगिरी केली होती. फिनिशरची भूमिका त्याने चोख पार पाडली होती.

तर सलामीवीर म्हणून संजू सॅमसन, शुबमन गिल यांच्यात अभिषेक शर्माबरोबर सलामीला उतरण्यासाठी चढाओढ असणार आहे. तर मधल्या फळीतील फलंदाजांचा विचार करता शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण श्रेयस अय्यरला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही संघात संधी मिळालेली नाही.

यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यरला भारताच्या आशिया कप संघात संधी का मिळाला नाही?

श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांनी संधी न मिळाल्याबाबत उत्तर देताना आगरकर म्हणाले, “यशस्वी जैस्वालला संघात संधी नाही मिळाली ही दुर्देवाची गोष्ट आहे. अभिषेक शर्मा गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याचबरोबर तो गोलंदाजीदेखील करतो. ज्यामुळे कर्णधाराला आवश्यक असल्यास अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध असतो.”

श्रेयस अय्यरबद्दल निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “श्रेयस अय्यरला संघात न घेणं दुर्देवाचं आहे, काही ठोस कारण नाही, पण कोणाच्या जागी त्याला संघात घ्यावं? यात ना त्याची चूक आहे ना आमची. शेवटी निवड १५ खेळाडूंची करता येते आणि सध्या त्याला संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागू शकते.”

आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह