Amanjot Kaur Catch IND vs SA Final Match : दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून हरमनप्रीत कौरच्या सेनेने आपल्या पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २९८ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाला केवळ २४६ धावाच करता आल्या. एकवेळ भारताची या सामन्यावरील पकड निसटत चालली होती; पण अमनज्योत कौरने घेतलेल्या एका कॅचने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. हा कॅच बघून क्रीडाप्रेमींना सूर्यकुमार यादवची आठवण झाली. त्याने २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा कॅच घेतला होता. दरम्यान, सामन्यानंतर अमनज्योत कौर समालोचकांबरोबर बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या काही षटकांत सावध फलंदाजी केली; पण मैदानावर जम बसल्यानंतर त्यांनी भारतीय गोलंदाजांना फैलावर घेतलं. सलामीला आलेल्या कर्णधार लॉरा वोल्वाडने आक्रमक फटके खेळत होती. एका बाजूला पडत असलेल्या विकेट्सचे कुठलेही दडपण तिच्यावर दिसत नव्हते. लॉराने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेने ४१ व्या षटकांत २२० धावांचा टप्पा ओलांडला होता.

आणखी वाचा : IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने फायनलमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

भारतीय संघावरील दडपण वाढवण्याचा नादात तिने दीप्ती शर्माला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू हवेत उंच गेला आणि अमनज्योत कौरने सुरेख झेल पकडला. विशेष म्हणजे उंच हवेत गेलेला हा झेल पहिल्यांदा अमनज्योतच्या हातातून निसटला होता. मात्र, तिने चेंडूवरील नजर न हटवता दुसऱ्या प्रयत्नात तो पकडला. हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला आणि भारताने आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर समालोचकांशी बोलताना अमनज्योतला अश्रू अनावर झाले.

“भारतीय संघासाठी हा झेल अतिशय महत्वाचा होता आणि तो टिपताना माझ्याकडून पहिल्या प्रयत्नात चूक झाली, पण तरीही मी चेंडूवरील लक्ष न हटवता अचूक झेल टिपला. खरंतर आजवर माझ्याकडून अशी चूक झालेली नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम झेल असून त्याबद्दल माझ्याकडे काहीच शब्द नाही”, असे अमनज्योत म्हणाली. दरम्यान, अमनज्योतने टिपलेल्या झेलचं क्रीडाप्रेमींनी तोंडभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : IND vs SA Final : अमनज्योत कौरचा रॉकेट थ्रो, अचूक लक्ष्य अन् मैदानावरील सर्वच अवाक्; VIDEO होतोय व्हायरल

“म्हारी छोरियाँ छोरों से बिल्कुल भी कम नही है जी! भारत माता की जय!”, “संपूर्ण भारताकडून तुम्हाला अभिमानाची मिठी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या सामन्यात अमनज्योतने फक्त झेलच नव्हे तर उत्तम क्षेत्ररक्षण करीत सुरेख फलंदाजी करणाऱ्या तॅझमिन बिट्सला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेला बॅटफूटवर ढकललं. तिने केलेल्या रॉकेट ‘थ्रो’चा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.