नवी दिल्ली : आगामी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या संघनिवडीवर माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टीका केली असून लयीत असलेला फलंदाज श्रेयस अय्यरला पुन्हा संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय अनाकलनीय आणि अन्यायकारक होता, असे परखड मत त्याने मांडले आहे. तसेच गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालला आता आशिया चषकासाठी केवळ राखीव खेळाडू म्हणून स्थान देणे हेसुद्धा योग्य नसल्याचे अश्विनने नमूद केले.
संयुक्त अरब अमिराती येथे ९ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची मंगळवारी निवड करण्यात आली. यात ‘आयपीएल’, तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयसला स्थान मिळू शकले नाही. ‘‘श्रेयसची काहीही चूक नाही. मात्र, आम्हालाही दोष देता येणार नाही. आपल्याकडे गुणवान खेळाडूंचे इतके पर्याय आहेत की कोणाची तरी निराशा होणारच. श्रेयसला संधीची वाट पाहावी लागेल,’’ असे स्पष्टीकरण निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिले. मात्र, अश्विनला हे फारसे पटले नाही.
‘‘भारतीय संघाची निवड करणे हे खूप अवघड काम आहे, हे मी मान्य करतो. तुम्हाला काही गुणी खेळाडूंना संघाबाहेर ठेवावे लागतेच. मात्र, श्रेयस आणि यशस्वी यांच्याबाबत जे घडले, ते अनाकलनीय आहे. निवड समितीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्पष्टीकरण दिले असेल अशी आशा आहे,’’ असे अश्विन आपल्या ‘यूट्यूब’ वाहिनीवर म्हणाला.
श्रेयसने या वर्षीच्या ‘आयपीएल’ हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना १७ सामन्यांत ६०४ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने या धावा १७५ हूनही अधिकच्या स्ट्राइक रेटने फटकावल्या. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालने १४ सामन्यांत १६०च्या स्ट्राइक रेटने ५५९ धावा केल्या. परंतु या दोघांनाही आशिया चषकासाठी संधी मिळू शकली नाही. त्याच वेळी कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली.
‘‘गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी जैस्वाल भारतीय संघात होता. तो तुमचा तिसऱ्या पसंतीचा सलामीवीर होता. मात्र, आता विश्वचषक विजेत्या संघातील या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवून गिलला संधी देण्यात आली आहे. गिलला माझा अजिबातच विरोध नाही. उलट त्याच्यासाठी मला आनंद होत आहे. मात्र, त्याच वेळी मला श्रेयस आणि यशस्वीसाठी वाईट वाटत आहे. त्यांना दिलेली वागणूक अन्यायकारक आहे,’’ असे अश्विनने सांगितले.
‘‘श्रेयसच्या कामगिरीवर एकदा नजर टाका. त्याला याआधीही संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर चॅम्पियन्स करंडकापूर्वी त्याने भारतीय संघात पुनरागमन करताना उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या जेतेपदात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. गिल सध्या अप्रतिम कामगिरी करत आहे यात शंका नाही. मात्र, श्रेयसबाबतही हेच म्हणता येईल.
गेल्या वर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाने जेतेपद पटकावले. त्यानंतर या वर्षीच्या स्पर्धेत त्याने पंजाब किंग्जचे यशस्वी नेतृत्व केले. पंजाबला २०१४ नंतर पहिल्यांदा अंतिम फेरी गाठता आली. तसेच उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्धही आता तो पूर्वीसारखा अडचणीत सापडत नाही. त्याने कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराविरुद्धही सहजपणे फटकेबाजी केली. त्याने आणखी काय करायला हवे?’’ असा प्रश्नही अश्विनने उपस्थित केला.
श्रेयस आणि यशस्वी हे दोघेही अतिशय नि:स्वार्थीपणे खेळणारे फलंदाज आहेत. ते स्वत:च्या कामगिरीपेक्षा संघहिताला महत्त्व देतात. आपण किती धावा केल्या, यापेक्षा आपण धावा किती वेगाने केल्या याबाबत, अर्थात सरासरीपेक्षा स्ट्राइक रेटबाबत ते अधिक विचार करतात. असे खेळाडू तुम्हाला हवे असतात. मात्र, इथे त्यांना भारतीय संघात स्थान मिळत नाही. हे समजण्यापलीकडचे आहे. ते यापुढे असे नि:स्वार्थीपणे खेळतील का? आता त्यांनी स्वत:च्या कामगिरीला आणि धावांना प्राधान्य दिले, तर त्यांना दोष देता येऊ शकेल का? – रविचंद्रन अश्विन, माजी कसोटीपटू.
अक्षरचा दोष काय?
कैफ भारतीय संघाने अखेरची ट्वेन्टी-२० मालिका इंग्लंडविरुद्ध खेळली, त्यावेळी डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल उपकर्णधार होता. मात्र, आता आशिया चषकासाठी तो संघात असूनही उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे सोपविण्यात आली आहे. अक्षरने असा काय दोष केला की त्याला आपले पद गमवावे लागले आहे, असा प्रश्न माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने उपस्थित केला. ‘‘निवड समितीने अक्षरशी संवाद साधून, त्याला उपकर्णधारपदावरून का दूर करण्यात आले हे आधीच सांगितले असेल अशी आशा आहे. त्याचा नक्की दोष काय? निवड समितीने त्याला स्पष्टीकरण द्यायलाच हवे,’’ असे कैफ म्हणाला. तसेच त्याने गिलच्या ट्वेन्टी-२० संघातील पुनरागमनाचे स्वागत केले. तीनही प्रारूपांत यशस्वी ठरण्याची गिलमध्ये क्षमता असल्याचे कैफने सांगितले.