Suryakumar yadav On Asia Cup 2025: आशिया चषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्याला जोरदार विरोधही केला गेला. मात्र, हा सामना यशस्वीरित्या पार पडला. या या सामन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी खूप काही घडलं. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता भारतीय संघाने आणखी एक मोठा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय कर्णधाराने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. सामना झाल्यानंतर संपूर्ण संघाने हस्तांदोलन करण्याऐवजी ड्रेसिंग रूमचे दार बंद करून घेतले. हा विजय सूर्यकुमार यादवने भारतीय लष्कराला समर्पित केला.

भारतीय संघाची कामगिरी पाहता, भारतीय संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार यात काहीच शंका नाही. मात्र ट्रॉफी जिंकल्यानंतर जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नकवी स्टेजवर असतील, तर भारतीय खेळाडू ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

पीटीआयने गोपनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नकवी जर ट्रॉफी देताना स्टेजवर असतील तर भारतीय खेळाडू स्टेजवर जाणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २१ सप्टेंबरला पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव झाला. आता दोन्ही संघ सुपर ४ मध्ये आमनेसामने येऊ शकतात. दरम्यान पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला, तर तिसऱ्यांदा भारत – पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.

या स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांअखेर अवघ्या १२७ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने दिलेलं आव्हान १५.५ षटकात पूर्ण केलं. यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.