Pakistan vs Bangladesh, Asia Cup 2025: आशिया चषकात २०२५ स्पर्धेत भारतीय संघाचा दमदार खेळ सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवत आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह भारतीय संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला. २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय संघ खेळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण दुसरा संघ कोणता असेल, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आज होणाऱ्या सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यफेरीचा सामना असणार आहे.
बांगलादेश- पाकिस्तान यांच्यात रंगणार करो या मरो सामना
या स्पर्धेत भारत, पाकिस्तान,श्रीलंका आणि बांगलादेश या ४ संघांनी सुपर ४ फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीतील शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यफेरीचा सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना करेल.
भारतीय संघाने सुपर ४ फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह ४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांना २ पैकी प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवता आला आहे. आज होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ४ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल. सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. पण या सामन्याचा गुणतालिकेवर कुठलाही फरक पडणार नाही. कारण श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
कोणता संघ अंतिम फेरीत जाणार?
भारतीय संघाने बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर विजय मिळवला आहे. सुपर ४ फेरीत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला. तर भारताने पाकिस्तानवर २ वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून एकतर्फी विजयाची नोंद केली होती. तर सुपर ४ फेरीत झालेल्या सामन्यातही भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता.त्यामुळे पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर क्रिकेट चाहत्यांना तिसऱ्यांदा भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो. असं झालं, तर ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना पाहायला मिळू शकतो.