मुंबई/दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा सामना आज रंगणार असला तरी पदाधिकारी, प्रतिष्ठितांनी या लढतीकडे सामान्य प्रेक्षकांप्रमाणे पाठच फिरवली आहे. एक प्रकारचा अदृश्य बहिष्कार ठरेल असे चित्र चोवीस तासांपूर्वी दिसत असून, ते प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशीदेखील तसेच राहणार आहे.

भारताच्याच हरभजन सिंगसह काही माजी क्रिकेटपटूंनी सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी खेळणे योग्य नसल्याची भूमिका घेतली आहे. समाजमाध्यमावरदेखील पाकिस्तानशी न खेळण्याच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा वेळी ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या बहुचर्चित सामन्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याची तिकिटेही संपलेली नाहीत. अशा वेळी प्रतिष्ठित व्यक्तींच्या न येण्यामुळे एरवी वलयांकित व्यक्तींच्या उपस्थितीने भरून जाणारा व्हीआयपी कक्षदेखील मोकळा राहणार आहे. सरकारचा निर्णय म्हणून खेळत आहोत असे सांगून ‘बीसीसीआय’ पदाधिकारी या संदर्भात अंग काढून घेत आहेत. अशा वेळी सामन्याला उपस्थित राहिल्यास टीकेचे लक्ष्य ठरू अशा भीतीपोटी कुणी दुबईत जाण्यास तयार नाही. एकप्रकारे सामन्यावर अदृश्य बहिष्कार टाकल्यासारखेच वातावरण आहे.

पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास होत असलेला विरोध सध्या मैदानावरील स्पर्धेपेक्षा खूप तीव्र झाल्यामुळे ‘बीसीसीआय’चा एखादा पदाधिकारी सामन्यासाठी उपस्थित राहिलाच, तर तो कॅमेऱ्यासमोर कसा येणार नाही याची काळजी घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कॅमेरामन्सना सूचना मिळत असल्याचे समजते.

एका संकेतस्थळावर आलेल्या माहितीनुसार भारताचा विजय निश्चित झाल्यानंतरच ‘बीसीसीआय’चा एक पदाधिकारी कॅमेऱ्यासमोर येईल. सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरच आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास सहमती दर्शवली आहे. यानंतरही देशात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास विरोध वाढत आहे. अशा वेळी आम्ही सामन्यादरम्यान कॅमेऱ्यासमोर आलो, तर आमच्याविरुद्ध वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भीती ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

तो एक पदाधिकारी कोण?

भारत-पाकिस्तान सामना म्हटला की आतापर्यंत ‘बीसीसीआय’चे शक्य तेवढे पदाधिकारी सामन्याला उपस्थित राहतात. या वेळी मात्र, अद्याप एकही पदाधिकारी दुबईत दाखल झालेला नाही. ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया, ‘आयपीएल’ अध्यक्ष अरुण धुमल, खजिनदार प्रभतेज भाटिया, सहसचिव रोहन देसाई यांच्यापैकी एकही व्यक्ती दुबईला जाणार नाही. ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा अमेरिकेत असल्यामुळे तेदेखील उपस्थित राहणार नाहीत. अशा वेळी सध्याचे हंगामी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रशासकीय सदस्य राजीव शुक्ला सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.