पीटीआय, दुबई

रोहित आणि विराट कोहली २०२७ मधील विश्वचषक खेळू शकणार की नाही हे सर्व त्यांच्या सध्या सुरू असलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीवर अवलंबून असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. याला रोहित, विराटचे अपयश कारणीभूत नाही, पहिल्या सामन्यातील भारताचा पराभव हे फलंदाजीमधील एकत्रित अपयश होते. यात रोहित, विराट खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत इतकेच आहे. ‘आयसीसी’च्या चर्चासत्रातील मालिकेतील रवी शास्त्री-रिकी पॉन्टिंग यांच्यादरम्यान झालेल्या संवादात दोघांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडली. यामध्ये रोहित, विराटचे भविष्य हा मुख्य विषय ठरला.

विश्वचषक २०२७ स्पर्धेचा विचार करत बसण्यापेक्षा दोघांनी अल्पकालीन ध्येय निश्चित करणे आणि पुढे जाणे हेच योग्य आहे, असे पॉन्टिंग यांनी सुचवले. ‘‘रोहित आणि विराट दोघेही सर्वोत्तम फलंदाज आहेत आणि ते सर्वोत्तम भारतीय संघात आहेत. पण, आता हे दोघे सध्या सुरू असलेल्या मालिकेत त्यांचे सर्वोत्तम देऊ शकतील का? हा प्रश्न उभा राहिला आहे आणि त्याचे उत्तर या मालिकेनंतरच मिळेल. ही मालिकाच ते विश्वचषक खेळू शकतील की नाही याचे उत्तर देऊ शकेल. त्यापेक्षा ही मालिका त्यांची कारकीर्द किती राहिली हे ठरवणारी असेल,’’ असे पॉण्टिंग म्हणाले.

निर्णयाची घाई कशाला – शास्त्री

ऑस्ट्रेलियातील पहिल्या सामन्यातील अपयशानंतर लगेच त्यांच्याविषयी मते मांडणे योग्य नाही. मला त्यांच्या कारकीर्दीविषयी निर्णय घेण्याची घाई नाही. त्यांना प्रदीर्घ विश्रांतीनंतर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यावा असे आपल्याला वाटत असल्याचे रवी शास्त्री यांनी सांगितले. तुम्ही खेळाचा किती आनंद घेता, खेळत राहण्याची तुमची भूक किती आणि तुमचा उत्साह किती यावर बरेच काही अवलंबून असते, त्यांच्या विषयी निर्णय घेण्यापेक्षा मला वाट पाहायला आवडेल, असे शास्त्री म्हणाले.