पीटीआय, अल रेयान
भारतीय संघाची ’एएफसी’ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठणे कठीण दिसत असले, तरीही अशक्य नाही. भारत आपल्या साखळी सामन्यात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणार आहे. भारतीय संघ २०११ आणि २०१९ मध्ये साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. यावेळीही त्यांना ‘ब’ गटात आस्ट्रेलिया, उझबेकिस्तान व सीरिया संघांसोबत ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठायची झाल्यास २३ जानेवारीला सीरियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे भारताचे लक्ष असेल. कारण, ऑस्ट्रेलिया व उझबेकिस्तान (१८ जानेवारी) संघ कामगिरीच्या बाबतीत भारताहून सरस आहेत. सीरियाविरुद्ध विजय मिळवल्यास भारतीय संघ गटात तिसऱ्या स्थानावर पोहचू शकतो. यामुळे भारताच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या शक्यता वाढतील. कारण, प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ पुढची फेरी गाठतील. यासह सहा गटांतील सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी राहणारे संघ पुढच्या फेरीत स्थान मिळवतील. ऑस्ट्रेलिया (२५ व्या स्थानी) व उझबेकिस्तान (६८ व्या स्थानी) यांना नमवणे कठीण असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच व कर्णधार सुनील छेत्री यांनी यापूर्वीच दिले आहेत.
हेही वाचा >>>NZ vs PAK: टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा टीम साऊदी ठरला पहिला गोलंदाज, पाकिस्तानविरुद्ध रचला ‘हा’ विक्रम
भारताने २००७ व २००९ मध्ये नेहरू चषक स्पर्धेत सीरिया संघाला नमवले होते. त्यामुळे छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारताला सीरियाविरुद्ध चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारताने बाद फेरी गाठल्यास ही अखेरची स्पर्धा खेळणाऱ्या छेत्रीसाठी मोठी गोष्ट असेल. पाच आशिया चषक स्पर्धेत सहभाग नोंदवणारा भारत २०१९ मध्ये बाद फेरी गाठण्याच्या जवळ होता. छेत्रीची ही तिसरी स्पर्धा आहे. छेत्रीने २०११ व २०१९मध्ये या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता व त्याने सहा सामन्यांत चार गोल झळकावले होते.
भारत अहमद बिन अली स्टेडियममध्ये २०१५च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलिया येथे जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आला आहे आणि दोन्ही संघ स्पर्धेत एकमेकांविरुद्ध केवळ एकदाच खेळले आहेत. ज्यामध्ये २०११च्या साखळी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असे पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियन संघ ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत नियमितपणे सहभागी होता. त्यांनी गेल्या सत्रात उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. २०१९मध्ये त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी भारत सर्वोत्तम संघासह स्पर्धेत उतरला आहे. बचावपटू अन्वर अली, मध्यरक्षक जॅकसन सिंह व आशिक कुरूनियान हे खेळाडू दुखापतीमुळे संघात सहभागी नाहीत. भारतीय पुरुष संघ प्रथमच ‘वीएआर’ तंत्राअंतर्गत हा सामना खेळणार आहे. या सामन्यादरम्यान जपानची योशिमी यामाशिता आशिया चषकात प्रथमच महिला पंच म्हणून पाहायला मिळेल.
’ वेळ : सायं.५ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-३, जिओ सिनेमा.