वृत्तसंस्था, मेलबर्न

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेच्या मॅडिसन कीजने शनिवारी दोन वेळच्या विजेत्या बेलारुसच्या अरिना सबालेन्कावर तीन सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत ६-३, २-६, ७-५ अशी मात करून ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. सबालेन्काचे सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

२९ वर्षीय कीजने कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर उमटवली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अव्वल दोन मानांकित खेळाडूंना पराभूत करणारी ती सेरेना विल्यम्सनंतरची पहिली टेनिसपटू ठरली आहे. सेरेनाने २००५ मध्ये अशी कामगिरी केली होती. यंदा कीजने उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित इगा श्वीऑटेकला पराभूत केले होते. मग अंतिम फेरीत तिने अग्रमानांकित सबालेन्काचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर आणि स्पर्धेत १९वे मानांकन असणारी कीज कारकीर्दीत दुसऱ्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरीची लढत खेळत होती. यापूर्वी २०१७ मध्ये तिने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्या वेळी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

अंतिम लढतीत पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला आक्रमक असणाऱ्या सबालेन्काला नंतर फटक्यांवर नियंत्रण राखता आले नाही. तिच्याकडून चार दुहेरी चुका झाल्याचा फायदा कीजला मिळाला. कीजने या सेटमध्ये तीन वेळा सबालेन्काची सर्व्हिस भेदली. कीजने खेळात राखलेली अचूकताच तिच्या विजेतेपदासाठी निर्णायक ठरली. बेसलाइनवरून खेळताना कीजने आक्रमक खेळू पाहणाऱ्या सबालेन्काला मागे राहून खेळण्यास भाग पाडले. कीजच्या डाव्या पायाला वेदनाशामक पट्ट्याही लावल्या होत्या. यानंतरही तिच्या हालचाली कमालीच्या सहज होत्या. कोर्टच्या प्रत्येक भागाचा ती वापर करत होती. अगदी नेटवर येण्याचेही धाडस कीजने अनेकदा दाखविले.

दुसरीकडे लय गमावलेली सबालेन्का दुसरा सेट सहजगत्या जिंकल्यानंतरही निराश दिसून आली. पिछाडीवर असताना सबालेन्काचा खेळ लौकिकानुसार झाला नाही. गुण गेल्यावर अनेकदा तिने चेंडूला लाथ मारली, तर कधी रॅकेटही हातातून सोडली आणि फोरहॅण्डचे फटके चुकल्यावर ती रॅकेट स्वत:च्याच पायावर मारून घेत होती. तिसऱ्या सेटमध्ये सबालेन्काची एक सर्व्हिस भेदणे कीजसाठी पुरेसे ठरले.

पुरुषांची अंतिम लढत आज

पुरुष एकेरीत आज, रविवारी अग्रमानांकित यानिक सिन्नेर आणि द्वितीय मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात विजेतेपदाची लढत रंगणार आहे. सिन्नेर गतविजेता असून, गेल्या वर्षी त्याने अमेरिकन स्पर्धाही जिंकली होती. झ्वेरेवला मात्र पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. यापूर्वी झ्वेरेवला दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. अमेरिकन स्पर्धेत २०२० मध्ये डॉमिनिक थिम, तर गेल्या वर्षी फ्रेंच स्पर्धेत कार्लोस अल्कराझकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता.

एकीकडे स्वप्नपूर्ती, दुसरीकडे स्वप्नभंग

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम लढतीनंतर कोर्टवर स्वप्नपूर्ती आणि स्वप्नभंग अशा दोन्ही परस्पर विरोधी भावना अनुभवयाला मिळाल्या. मॅडिसन कीजने आपले ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले. दुसरीकडे सबालेन्का ऑस्ट्रेलियन स्पर्धेत जेतेपदाच्या हॅट्ट्रिकपासून वंचित राहिली. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अशी अनोखी हॅट्ट्रिक १९९७ ते १९९९ या कालावधीत मार्टिना हिंगिसने नोंदवली होती. त्यानंतर एकही महिला खेळाडू अशी कामगिरी करू शकलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open tennis tournament madison keys wins title amy