अझलन शाह चषक हॉकी स्पर्धा ही भारताच्या युवा खेळाडूंसाठी स्वत:चे नैपुण्य दाखविण्यासाठी उत्तम संधी आहे. त्यामुळेच या स्पर्धेत भारतीय संघाकडून अव्वल दर्जाची कामगिरी अपेक्षित नाही, असे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले.
‘‘कनिष्ठ गटाची विश्वचषक स्पर्धा यंदा होणार असल्यामुळे या स्पर्धेकरिता युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अधिकाधिक अनुभव मिळणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच आगामी अझलन शाह चषक स्पर्धेत आमच्या युवा खेळाडूंचा विकास करण्याचे माझे ध्येय आहे. युवा खेळाडूंवर आमचा भर असल्यामुळे या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची मी अपेक्षा करीत नाही,’’ असे नॉब्स यांनी सांगितले.
या स्पर्धेकरिता निवडलेल्या संघात भारताचा नियमित कर्णधार सरदारा सिंग याच्यासह सहा खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. याबाबत विचारले असता नॉब्स म्हणाले, ‘‘सरदारासह अनुभवी खेळाडूंना थोडीशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्याहीपेक्षा कनिष्ठ गटाच्या आगामी विश्वचषक स्पर्धेकरिता भक्कम संघ बांधणीकरिता अझलान शाह स्पर्धेतील अनुभवच उपयुक्त ठरणार आहे. तसेच भारताचा भावी संघ बांधण्यासाठीही आतापासूनच विचार करण्याची गरज आहे. युवा खेळाडूंना संधी मिळाली तर निश्चितपणे संघातील खेळाडूंची निवड करतानाही अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. मनदीप सिंग याने हॉकी लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. हॉकी लीगपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने अधिक आव्हानात्मक असतात आणि तेथेच खरा कसर दिसून येतो हे मनदीपला लक्षात आले आहे.’’