Babar Azam appeal to journalists not to call him King in Tri Series 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानात तिरंगी मालिका खेळली जात आहे. या दरम्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने पत्रकारांना एक खास आवाहन केले आहे. त्याने पत्रकारांना आपल्याला किंग म्हणून न संबोधण्याची विनंती केली आहे. बाबर आझम पाकिस्तानमध्ये किंग या टोपणनावाने ओळखला जातो. बाबरला त्याच्या कामगिरीमुळे किंग म्हटले जाते. आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर आझम खराब फॉर्ममधून जात आहे –

बाबरने आतापर्यंत पाकिस्तानसाठी ५९ कसोटी, १२५ एकदिवसीय आणि १२८ टी-२० सामने खेळले आहेत आणि अनुक्रमे ४२३५, ५९९० आणि ४२२३ धावा केल्या आहेत. तिरंगी मालिकेच्या वेळी बाबरने पत्रकारांना सांगितले की, ‘मला किंग म्हणणे थांबवा. मी किंग नाही. माझी आता एक नवीन भूमिका आहे, मी आधी जे काही केले आहे, ते भूतकाळात गेले आहे. प्रत्येक सामना एक नवीन आव्हान घेऊन येतो. मी फक्त भविष्यावर आणि सध्याच्या परिस्थितीवर विश्वास ठेवतो. बाबर वाईट फॉर्ममधून जात असताना त्याने पत्रकारांना आवाहन केले आहे.

सर्फराझ खानला जेतेपद राखण्याची आशा –

पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराझ खानच्या मते, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फखर जमान आणि बाबर आझम जेतेपद राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावतील. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरवून पाकिस्तानने जेतेपद पटकावले होते. सर्फराझ म्हणाला, “पाकिस्तानकडे जेतेपद राखण्याची चांगली संधी आहे. मला वाटते की हा एक मजबूत संघ आहे. २०१७ च्या संघातील काही खेळाडू अजूनही खेळत आहेत आणि आम्हाला बाबर आझमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.”

सर्फराझ खानकडून बाबर आझमचे कौतुक –

सर्फराझ खान पुढे म्हणाला, “२०१७ चा बाबर आता वेगळा आहे. बाबर आता खूपच परिपक्व खेळाडू बनला आहे आणि तो एक प्रभावशाली खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे आणि फखर जमानच्या बाबतीतही तेच आहे. जेव्हा भारत-पाकिस्तान आमनेसाामने येतात, तेव्हा तो एक खास प्रसंग असतो. या सामन्याबद्दल खूप हाईप आणि दबाव असते. पण एक खेळाडू म्हणून तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि बाहेरील आवाजाकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करावा लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam has requested the media to stop calling him king during tri series 2025 video viral vbm