नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सोमवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यापासून रोखण्याची विनंती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कुस्तीगिरांनी यापूर्वीही अशी विनंती क्रीडामंत्र्यांना केली होती. या वेळी त्यांनी थेट संजय सिंह यांचे नाव घेतले आहे. विविध कारणांनी लांबणीवर पडलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

हेही वाचा >>> U-19 World Cup: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला, अंडर-१९ विश्वचषकाचे वेळपत्रक जाहीर

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना बजरंग, साक्षीसह बऱ्याच भारतीय मल्लांनी या वर्षांच्या सुरुवातीला आंदोलन केले होते. त्यांनी ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. तसेच ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती निवडणूक लढणार नाही, असे आश्वासन क्रीडामंत्र्यांकडमून मिळाल्यावरच त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संजय सिंह आणि माजी कुस्तीगीर अनिता शेरॉन यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगून बजरंग आणि साक्षी यांनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडण्यात नवे आव्हान उभे केले आहे. अनिता शेरॉन या माजी कुस्तीगीर असून २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia sakshi malik meet sports minister anurag thakur requesting him to stop sanjay singh from contesting wfi polls zws70