भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माझ्यावर भारताकडून खेळण्यास निर्बंध घातले आहेत. पण मी दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो, असे सूचक विधान वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने केले आहे. मी आणखी सहा वर्ष क्रिकेट खेळू शकतो असेही त्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑगस्टमध्ये केरळ हायकोर्टाने श्रीशांतला निर्दोष ठरवत त्याच्यावरील बंदी उठवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले होते. याविरोधात बीसीसीआयने केरळ हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल केली होती. मंगळवारी केरळ हायकोर्टाने बीसीसीआयच्या याचिकेवर निकाल दिला होता. श्रीशांतवरील आजीवन बंदी कायम ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला. यामुळे श्रीशांतचे भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न भंगले होते.

शुक्रवारी श्रीशांतने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून यामध्ये श्रीशांतने दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले. श्रीशांत म्हणाला, बीसीसीआयने माझ्यावर आजीवन बंदी घातली आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातलेली नाही. मी दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळू शकतो. मी आता ३४ वर्षांचा असून मी आणखी ६ वर्ष क्रिकेट खेळू शकतो, असे त्याने सांगितले. ‘माझे क्रिकेटवर प्रेम असून मला क्रिकेट खेळायचे आहे. मी पुन्हा मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहे. बीसीसीआय ही एक खासगी संस्था असल्याचे त्याने नमूद केले.

केरळ हायकोर्टाच्या निर्णयानंतर श्रीशांतने दुसऱ्यांदा बीसीसीआयवर टीका केली. लोढा समितीने स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना एक न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय का असा सवाल श्रीशांतने विचारला होता.

काय होते प्रकरण?
आयपीएल २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघातील श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडेला यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे, मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र पोलिसांकडे सबळ पुरावे नसल्याने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून या तिघांची सुटका झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci imposed ban not icc i can play for any other country says indian pacer s sreesanth