BCCI Pension Scheme For Retired Cricketers: भारतीय क्रिकेट चाहते २०२५ हे वर्ष कधीच विसरू शकणार नाहीत. याच वर्षात ४ दिग्गज भारतीय खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आर अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विराट आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला रामराम केलं. अलीकडेच चेतेश्वर पुजारानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांना बीसीसीआयकडून किती पेन्शन मिळते? जाणून घ्या.
निवृत्त होणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयकडून किती पेन्शन मिळते?
बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. ही पेन्शन योजना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे, खेळाडूचं वय वाढल्यानंतर त्यांच्या पेन्शनच्या रकमेतही वाढ होते. वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतर पेन्शनमध्येही वाढ होते.
खेळाडूंना किती पेन्शन मिळते?
माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीयकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आधी ३७,५०० रुपये इतकी पेन्शन दिली जायची. आता या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना ६०,००० रुपये पेन्शन दिली जाते. तर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची पेन्शन १५,००० हून ३०,००० रूपये पेन्शन दिली जाते. आधी वरिष्ठ खेळाडूंना ५०,००० रुपये इतकी पेन्शन दिली जायची. आता ही रक्कम वाढवण्यात आली आहे. आता वरिष्ठ खेळाडूंना ७०,००० रुपये पेन्शन दिली जाते.
बीसीसीआयकडून दिली जाणारी पेन्शनची रक्कम ही दरवर्षी वाढवली जात नाही. बीसीसीआयकडून खेळाडूंचा विचार केला जातो. वाढती महागाई आणि खेळाडूंवर येणाऱ्या आर्थिक समस्यांचा विचार करता पेंशनच्या रकमेतही वाढ केली जाते. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे किंवा देशातंर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे अशा खेळाडूंना बीसीसीआयकडून पेन्शन दिली जाते. या योजनेत महिला क्रिकेटपटू आणि काही पंचांचा देखील समावेश आहे.