Virat Kohli- Rohit Sharma ODI Retirement: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या कसोटी आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. तर आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर दोघांनी एकत्र टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं होतं. आता दोघांच्या वनडे फॉरमॅटमधून निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
येत्या २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे दोघेही ही स्पर्धा झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा करतील असं म्हटलं जात आहे. मात्र काहींच्या मते, हे दोघे या स्पर्धेआधीच निवृत्ती करू शकतात. पण राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे की, दोघेही चांगलं खेळत आहेत आणि फिट असल्यामुळे ते आणखी खेळू शकतात.
यूपी टी-२० लीग स्पर्धेतील एका मुलाखतीदरम्यान राजीव शुक्ला यांना विराट आणि रोहितच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ही जोडी अजूनही चांगली खेळत आहे. बोर्ड त्यांना निवृत्ती घेण्यासाठी सांगणार नाही. तर फेअरवेल सामन्याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल.
राजीव शुक्ला म्हणाले, “ त्यांनी अजूनही निवृत्ती जाहीर केलेली नाही. दोघेही चांगलं खेळत आहेत ना? त्यांनी जर निवृत्ती घेतली नाहिये तर मग फेअरवेल सामन्याच्या चर्चा कशाला? ते अजूनही वनडे क्रिकेट खेळत आहेत. इतकी काळजी करू नका. बीसीसीआयचा प्लॅन स्पष्ट आहे. आम्ही कोणालाही निवृत्ती घेण्यासाठी सांगत नाही. खेळाडू स्वतः निर्णय घेतात. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.” यावरून हे स्पष्ट होत आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात.