Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजय परेड काढण्यात येणार असताना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात कर्नाटक सरकारने कारावाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्थेच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. चेंगराचेंगरीच्या संदर्भात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात केएससीए आणि आरसीबीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.
निवेदनात काय म्हटलं?
“गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांमुळे आणि आमची भूमिका मर्यादित असली तरी नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही सांगू इच्छितो की काल रात्री आम्ही कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या सचिव आणि कोषाध्यक्षपदाचा राजीनामा कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सादर केला आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, ४ जणांना अटक
कर्नाटक पोलिसांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली आहे. तसेच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते. तसेच या संपूर्ण घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं होतं.
नेमकं घटना काय घडली?
आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत तब्बल ४७ पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.