Arshdeep Singh Replacement: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना येत्या २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंचा कसून सराव सुरु आहे. २-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला जर या मालिकेत टिकून राहायचं असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आला आहे.

अंशुल कंबोज हा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज भारतीय अ संघाचा देखील भाग होता. भारतीय अ संघाकडून खेळताना त्याला २ तीन दिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने दोन्ही सामन्यात मिळून ५ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. यासह अंशुल कंबोजच्या नावे रणजी ट्रॉफी स्पर्धेत हरियाणाकडून खेळताना एकाच डावात १० गडी बाद करण्याचा विक्रम देखील आहे. त्याची वेगवान आणि अचूक लाईन लेंथवर असलेली गोलंदाजी ही भारतीय संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

अर्शदीप सिंगच्या जागी संघात स्थान

बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंग गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या हाताला टाके लावण्यात आले आहेत. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी कमीत कमी १० दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी अंशुल कंबोजला संघात स्थान दिलं आहे. अर्शदीप सिंग चौथ्या कसोटीआधी सराव करत असताना साई सुदर्शनला नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. त्यावेळी चेंडू अडवताना त्याच्या हाताला लागला. त्यामुळे त्याला चौथा कसोटी सामना खेळता येणार नाही. अर्शदीपला मालिकेतील सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता होती. पण त्याला मोक्याच्या क्षणी बाहेर पडावं लागलं आहे.

अंशुल कंबोजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४ सामने खेळले आहेत. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला ७९ गडी बाद करता आले आहेत. यादरम्यान त्याने एकाच डावात १० गडी बाद करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. अर्शदीप सिंगसह भारतीय संघासाठी आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. या सामन्यात आकाशदीपच्या खेळवण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण तिसऱ्या कसोटीतही दुखापतीमुळे त्याला काही वेळ मैदानाबाहेर जावं लागलं होतं. आता चौथ्या कसोटीत कोणाला संधी मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.