भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय मालिकेत त्याने सर्वात वेगाने दहा हजार धावा आणि ३८ शतकांचा पल्ला गाठला आहे. आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर विराट कोहलीने दिग्गज खेळाडूंची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विराट कोहलीला डीआरएसचा वापर करणारा जगातील सर्वात खराब कर्णधार म्हटले होते. आता मायकेल वॉनने काही हटके पद्धतीने विराट कोहलीवर वक्तव्य केले आहे. आपल्या वेगळ्या ट्विटसाठी ओळखला जाणाऱ्या मायकेल वॉनने आपल्या वाढदिवसाला विराटच्या फॅन्सची फिरकी घेतली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी मायकेल वॉनचा वाढदिवस असतो. मायकेल वॉनने आपल्या वाढदिवसाला एका बोकडासोबत सेल्फी घेत सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘गुड मॉर्निंग..विराटसोबत वाढदिवसाची सेल्फी!’ असे कॅप्शन टाकले. बोकडाला इंग्रजीमध्ये GOAT म्हटले जाते. सध्या जगातील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज खेळाडूंसाठी GOAT या शब्दाचा वापर केला जातो. GOAT म्हणजे Greatest Of All Time (सर्वकालीन महान खेळाडू) म्हटले जातेय. वॉनने आपल्या या हटके प्रयत्नाद्वारे विराट कोहलीला सर्वकालीन महान खेळाडू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

मात्र, विराट कोहलीच्या चाहत्यांना वॉनची ही हटके आयडिया रूचलेली दिसत नाही. मायकेल वॉनच्या या ट्विटनंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उडवली आहे. काही नेटीझन्सला वॉनची आयडिया आवडली आहे. त्यावर त्यांनी वॉनच्या कल्पकबुद्धीचे कौतुकही केले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सध्या विराट कोहलीचा मोठा फॅन झाला आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीचा मायकेल वॉन आनंद घेताना दिसतोय. वेस्ट इंडिजबरोबर सुरू असलेल्या मालिकेत विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यात शतकी खेळी केल्या होत्या. या तिन्ही वेळी मायकेल वॉनने आपल्या कल्पकतेचा वापर करत सोशल मीडियार FACT आणि बोकडाचा इमोजी पोस्ट केला होता. याद्वारे विराट कोहली सध्या सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे सांगण्याचा प्रयत्न मायकेल वॉनचा असेल.

मायकेल वॉनचे ते तीन ट्विट

दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने २१५ एकदिवसीय सामन्यातील २०७ डावांत १०,१९९ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीने ३८ शतके आणि ४८ अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नावावर ६३३१ धावांची नोंद आहे. यादरम्यान विराट कोहलीने २४ शतके झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नावावर आता एकूण ६२ शतकांची नोंद आहे.