महाराष्ट्राच्या राजकीय आखाडय़ात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीने मागील आठवडा गाजला. मुख्यमंत्री चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सोमवारी क्रिकेटवर्तुळात खमंगपणे रंगली होती. या पाश्र्वभूमीवर चव्हाण आणि पवार यांच्यातील हीच ‘ठस्सन’ मुंबई क्रिकेटच्या रणांगणावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील माझगाव क्रिकेट क्लबने मुख्यमंत्री चव्हाण यांना एमसीएच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधित्व दिले आहे. एमसीएच्या नियमानुसार, संघटनेशी संलग्न असलेल्या क्लबचा प्रतिनिधीच निवडणुकीचा अर्ज भरू शकतो. एमसीएची द्वैवार्षिक निवडणूक येत्या १८ ऑक्टोबरला होणार आहे. संघटनेचे सदस्य आणि संलग्न क्लबच्या प्रतिनिधींची नावे कळविण्यासाठी १७ सप्टेंबर ही अंतिम तारीख असून पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून निवडणुकीची रीतसर प्रक्रिया सुरू होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे मैदान गाजविणाऱ्या शेषराव वानखेडेंपासून विलासराव देशमुखांपर्यंतच्या अनेक नेत्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमच्या तोडीचे स्टेडियम उभारण्यासाठी शेषराव वानखेडे यांनी पुढाकार घेतला आणि तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानावर राजकारणी नेत्यांचा प्रभावी वावर दिसू लागला. राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे क्रिकेट क्लब्सनादेखील भक्कम आर्थिक आधार मिळाल्याने अनेक लहानमोठय़ा क्रिकेट क्लब्सची भरभराट झाली. मनोहर जोशी, शरद पवार, विलासराव देशमुख आदी माजी मुख्यमंत्र्यांनी एमसीएचे अध्यक्षपदही भूषविले आहे. राजकीय पक्षभेद बाजूला सारून हे नेते या निवडणुकीत उतरत असल्याच्या इतिहासामुळे या संस्थेच्या निवडणुकीबद्दल क्रीडाक्षेत्राइतकीच राजकीय क्षेत्रातही कमालीची उत्सुकता असते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे माझगाव क्लबचे प्रतिनिधी म्हणून यापुढे एमसीएच्या सर्व बैठकांना उपस्थित राहणार असून एमसीएच्या नोंदीत त्यानुसार आवश्यक ते बदल करावेत, अशी विनंती करणारे नीलम शहाआलम शेख व शहाआलम शेख यांच्या स्वाक्षरीचे पत्र माझगाव क्लबतर्फे एमसीएच्या संयुक्त सचिवांना पाठविण्यात आले आहे.
एमसीएचे माजी अध्यक्ष विलासराव देशमुख हेदेखील माझगाव क्लबचेच प्रतिनिधित्व करत होते. २०११मध्ये झालेल्या एमसीएच्या निवडणुकीत दिलीप वेंगसरकर यांचा पराभव करून विलासराव देशमुख हे अध्यक्षपदी विराजमान झाले होते. दहा वर्षे एमसीचे अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांचा त्यावेळी देशमुख यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा होता. देशमुख यांच्या निधनामुळे हे पद रिक्त आहे. सध्या रवी सावंत यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद आहे.
माझगाव क्लबचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित करण्याचा निर्णय म्हणजे, त्यांना एमसीए निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची पूर्वतयारी असल्याचेच मानले जात आहे. केवळ बैठकांना हजेरी लावण्यापुरते मर्यादित प्रतिनिधित्व करणे, हा निश्चितच मुख्यमंत्र्यांचा उद्देश नसणार, अशी चर्चा मुंबईच्या क्रिकेटवर्तुळात सुरू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांचे अध्यक्षपद निश्चित असणार, असे सांगण्यात येत आहे. आता हा मान घ्यायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असे माझगाव क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
पवारांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री क्रिकेटच्या मैदानात?
महाराष्ट्राच्या राजकीय आखाडय़ात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीने मागील आठवडा गाजला.

First published on: 17-09-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister may enter in the of game of cricket to challenge pawar