पीटीआय, शेन्झेन

भारताची तारांकित खेळाडू पीव्ही सिंधू, तसेच सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आघाडीच्या पुरुष दुहेरीतील जोडीने गुरुवारी सरळ गेममध्ये विजय नोंदवत चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने घोडदौड कायम राखताना थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगला २१-१५, २१-१५ असे ४१ मिनिटांत नमविले. जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असणाऱ्या सिंधूसमोर उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित कोरियाच्या आन से यंगचे आव्हान असेल. यंगने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला २३-२१, २१-१४ असे पराभूत केले. हाँगकाँग स्पर्धेत पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सिंधूने चीन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पोर्नवापीविरुद्ध तिने सावध खेळ केला. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूला आव्हान मिळाले, मात्र निर्णायक क्षणी गुणांची कमाई करीत तिने सामन्यात आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही तिने आपली हीच लय कायम राखताना गेमसह सामना जिंकला.

सात्त्विक-चिरागची चमक

हाँगकाँग स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने चायनीज तैपेइच्या सियांग चिएह चियू आणि वांग ची-लिन जोडीला ३२ मिनिटांत २१-१३, २१-१२ असे पराभूत करत चीन मास्टर्सची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच हाँगकाँग स्पर्धेत चियू व वांग जोडीला तीन गेममध्ये नमविले होते. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने ७-२ अशी चांगली सुरुवात केली आणि १५ मिनिटांहून कमी वेळेत गेम आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी जोडीला पुनरागमनाची संधी दिली नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर चीनच्या रेन जियांग यू आणि झी हाओनान यांचे आव्हान असणार आहे.

या विजयाने मी आनंदी आहे. पोर्नवापी आघाडीची खेळाडू आहे. तिची गुणवत्ता ठाऊक असल्याने पहिला गेम जिंकल्यानंतरही दुसऱ्या गेममध्ये मी अधिक सतर्कतेने खेळले. मी सर्वोत्तम कामगिरी केली आणि विजय मिळवला याचे समाधान आहे. आता पुढील सामन्यात हीच लय राखण्याचा माझा प्रयत्न असेल. –पीव्ही सिंधू