आयपीएल स्पर्धेतल्या लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मालकी बदलणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असं झाल्यास आरसीबीचा चेहरामोहरा बदलून जाईल. यंदाच्या वर्षी रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पहिल्यांदा प्रत्यक्षात साकारलं. विराट कोहलीचा संघ अशी या संघाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर १७ वर्ष आयपीएलचा अविभाज्य भाग असलेल्या संघाच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि ख्रिस गेल हे एक अनोखं समीकरण आहे. मैदानात चौफेर फटकेबाजी करत गेल एकहाती सामन्याचं चित्र पालटवत असे. मात्र हाच गेल आरसीबीच्या ताफ्यात आला तरी कसा? याची गोष्ट रंजक आहे.

२०११ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे डर्क नॅन्स हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. ऑस्ट्रेलियाचा हा उंचपुरा खेळाडू आरसीबीच्या योजनांचा महत्त्वाचा भाग होता. मात्र दुसऱ्याच सामनादरम्यान नॅन्स दुखापतग्रस्त झाला. नियमानुसार नॅन्सच्या मानधनापेक्षा जास्त रक्कम देऊन बदली खेळाडू घेण्याला परवानगी नव्हती. गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने आरबीसीचा संघ तशाच स्वरुपाचा गोलंदाज घेईल अशी शक्यता होती मात्र त्यांनी चाहत्यांना धक्का देत ख्रिस गेलला निमंत्रण दिलं.

गेल इच्छुक असण्याबरोबरीने त्याला वेस्ट इंडिज किकेट बोर्डाने परवानगी देणं आवश्यक होतं. याच काळात वेस्ट इंडिज-पाकिस्तान मालिका होणार होती. या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं गेलने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं. गेल एका दुखापतीतून सावरत असल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचं बोर्डाला वाटलं. प्रत्यक्षात गेल आयपीएल खेळणार होता. बोर्डातर्फे रिहॅब प्रक्रियेचा भाग असूनही गेलने आयपीएल खेळणार यासंदर्भात त्याने कळवलं होतं.

आधीच्या तीन हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे खेळताना गेलने १४१.५९च्या स्ट्राईकरेटने ४६३ धावा केल्या होत्या. एवढी उत्तम कामगिरी असूनही गेलला २०११ लिलावात कोणी खरेदी केलं नाही. गेलची बेसप्राईज .. इतकी होती. या काळात वेस्ट इंडिजच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालितेत तो खेळेल अशी चिन्हं होती. पूर्ण हंगाम उपलब्ध नसल्यामुळे संघांनी गेलच्या नावाचा विचार केला नाही.

नॅन्स दुखापतग्रस्त झाल्यानंतर आरसीबी संघव्यवस्थापनाने गेलशी संपर्क केला. तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर गेल आरसीबीकडून खेळण्यासाठी सज्ज झाला. योगायोग म्हणजे गेलने त्याच्या आधीच्याच संघाविरुद्ध म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सचविरुद्ध आरसीबीसाटी पदार्पण केलं. कोलकाताने १७१ धावांची मजल मारली. गौतम गंभीरने ४८ तर युसुफ पठाणने ४६ धावा केल्या. जॅक कॅलिसने ४० धावा केल्या. बंगळुरूने गेलच्या वादळी शतकाच्या बळावर ११ चेंडू आणि ९ विकेट्स राखून सामना जिंकला. गेलने आपली ताकद सिद्ध करत १० चौकार आणि ७ षटकारांसह ५५ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली. गेललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध बंगळुरूने २०५ धावांचा डोंगर उभारला. गेलने अवघ्या ४९ चेंडूत १० चौकार आणि ९ षटकारांसह १०७ धावांची तडाखेबंद खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने १२० धावा केल्या. बंगळुरूतर्फे श्रीनाथ अरविंदने ४ तर गेलने ३ विकेट्स पटकावल्या. शतक आणि ३ विकेट्स अशा अष्टपैलू कामगिरीसाठी गेललाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

बदली खेळाडू म्हणून दाखल झालेल्या गेलने हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला. गेलने १२ सामन्यात १८३.१३च्या स्ट्राईकरेटसह ६०८ धावा केल्या. यामध्ये २ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश केला. आरसीबीने त्या हंगामात फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलमध्ये मात्र रवीचंद्रन अश्विनच्या फिरकीसमोर त्याला भोपळाही फोडता आला नाही.

बदली खेळाडू म्हणून का होईना पण मान देणाऱ्या आरसीबीसाठी गेलने पुढच्या हंगामात धुमाकूळ घातला. २०१२ मध्ये गेलची बॅट तळपली आणि त्याने १५ सामन्यात १६०.७४च्या स्ट्राईकरेटने ७३३ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. सलग दुसऱ्या वर्षी गेलला ऑरेंज कॅप पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आरबीसीसाठी तिसऱ्या हंगामातही गेलचं वादळ घोंघावलं. २०१३ मध्ये गेलची ऑरेंज कॅप थोडक्यात हुकली पण त्याने धावांची टांकसाळ उघडलीच. गेलने २०१३ हंगामात १६ सामन्यात १५६.२९च्या स्ट्राईकरेटने ७०८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता.

२०१४ हंगामात गेलला लौकिकासारखा खेळ करता आला नाही. ९ सामन्यात त्याने १०६च्या स्ट्राईकरेटने १९६ धावा केल्या. २०१५ हंगामात गेलने १४ सामने खेळत १४४च्या स्ट्राईकरेटने ४९१ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. २०१६ हंगामात गेलचं वादळ ओसरलं. त्याने १० सामन्यात २२७ धावा केल्या. यामध्य २ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. २०१७ मध्ये गेलने ९ सामन्यात १२२च्या स्ट्राईकरेटने २०० धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

सात हंगामानंतर मात्र आरसीबीने गेलला रिटेन केलं नाही आणि अद्भुत अशा प्रवासाची सांगता झाली.