Chris Woakes on Batting with Shoulder Injury IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत राहिली. ओव्हलच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या या विजयात संपूर्ण संघासह मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने मोठी भूमिका बजावली. पण यादरम्यान इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने सर्वांचं लक्ष वेधलं. खांद्याला फ्रॅक्चर असतानाही तो एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता.
ओव्हल कसोटीदरम्यान ख्रिस वोक्सने दाखवलेल्या जिद्दीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. ख्रिस वोक्सचा डावा खांदा निखळलेला असतानाही तो वेदनेसह संघासाठी फलंदाजीला उतरला होता. विकेट्सदरम्यान धावत असतानाही त्याला प्रचंड वेदना होत होत्या, पण तरीही मात्र तो खेळताना दिसला. आता, ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’शी बोलताना, वोक्सने फलंदाजी करतानाचा अनुभव सांगितला आहे.
भारताच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना ५७व्या षटकात त्याला दुखापत झाला. वोक्स सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना त्याने चेंडू चौकारासाठी जाण्यापासून वाचण्यासाठी डाईव्ह मारली आणि तो सीमारेषेपलीकडे गेला. मैदानावरच त्याने आपला खांदा पकडला आणि वेदनेने विव्हळत तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो गोलंदाजीला देखील उतरला नाही.
वोक्सने खांदा निखळला असतानाही भारताविरूद्ध कशी फलंदाजी केली?
ख्रिस वोक्स अखेरच्या डावात फलंदाजी करण्याबद्दल म्हणाला, “खांद्याला जेव्हा दुखापत झाली, तेव्हा डोक्यात पटकन विचार आला; माझं करियर तर संपलं नाही ना? पण सामन्यादरम्यान मी फलंदाजीला उतरणार की नाही, हा प्रश्नच नव्हता. सामना जसा अधिक अटीतटीचा होत आला, तेव्हा प्रश्न हाच होता की मी एकाहाताने खेळणार कसा आहे?”
वोक्स पुढे म्हणाला, “मैदानावर उतरण्याचा निर्णय कधीच बदलला नाही. संघासाठी मैदानावर उतरून खेळणं हे माझे कर्तव्य आहे, फक्त संघासाठी नाही तर आमच्यासह उभ्या राहिलेल्या सर्वांसाठी. माझ्या खांद्याला किती दुखापत झाली आहे याच्यापेक्षा, त्यावेळी मला फक्त संघासाठी खेळायचे होतं, हे माहित होतं,” असं वोक्स पुढे म्हणाला.
“मनात अनेक विचार सुरू होते. मला आशा होती की गस एटकिन्सन दुसऱ्या टोकाला असताना आम्ही सामना जिंकू आणि मला चेंडूही खेळावा लागणार नाही. पण दुर्देवाने तसं झालं नाही”, असं वोक्स म्हणाला.
वोक्स फलंदाजीला उतरला होता तेव्हा भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती. त्याचा डावा हात पट्ट्यांनी गुंडाळलेला होता, जो त्याने त्याच्या स्वेटरमध्ये लपवला होता. पण तरीही तो संघासाठी मैदानावर उतरून खेळत होता.