Why Team India Continues to Struggle against Spin मुंबई : बेदी-प्रसन्ना-चंद्रा-वेंकट या प्रसिद्ध फिरकी चौकडीच्या काळाचे स्मरण व्हावे अशा पद्धतीने चार फिरकी गोलंदाज खेळवूनही भारतीय क्रिकेट संघाला, इडन गार्डन्ससारख्या घरच्या मैदानावर समोरच्या संघातील एक फिरकी गोलंदाजही भारी पडला. भारतीय संघावर अशी वेळ वारंवार का येते, याचा या निमित्ताने गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. 

याचे कारण आपल्याकडे स्थानिक क्युरेटर किंवा खेळपट्टी संवर्धकाच्या अनुभवापेक्षा किंवा ज्ञानापेक्षा भारतीय संघाच्या कर्णधार-व्यवस्थापकाच्या मताला फाजील महत्त्व दिले जाते. कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या डावात भारताला १२४ धावांचे लक्ष्यही गाठता आले नाही आणि १०० धावांच्या आत (९३) हा संघ गारद झाला. अशा प्रकारे पराभूत होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ नव्हे.

फिरकीसमोर वारंवार अपयश

गेल्या वर्षी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध १४७ धावांचे लक्ष्य आपल्याला गाठता आले नव्हते. भारतीय संघ त्यावेळी १२१ धावांमध्ये उखडला गेला. त्यावेळी न्यूझीलंडच्या अजाझ पटेलसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटावर अजाझ पटेल, ईश सोढी आणि ग्लेन फिलिप्स यांची फिरकी भारी ठरली. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर असे चार फिरकी गोलंदाज खेळवले.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच काटकोनात वळेल, अशा पद्धतीने बनवण्यात आली. प्रत्यक्षात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बेवुमा या एकमेव फलंदाजाने अर्धशतकी मजल मारली. भारताचा कर्णधार शुभमन गिल हा जायबंदी झाला, त्यामुळे फार खेळूच शकला नाही हे कबूल, पण त्याच्या अनुपस्थितीतही बाकीच्या अनेक फलंदाजांनी बऱ्यापैकी सुरुवात करूनही नंतर तग धरला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ऑफस्पिनर सायमन हार्मरने दोन्ही डावांत प्रत्येकी चार बळी मिळवले. त्याचा फिरकी सहकारी केशव महाराजला दोन्ही डावांत मिळून केवळ तीनच बळी मिळाले. पण दक्षिण आफ्रिकेच्या वतीने वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने मोक्याच्या वेळी भारतीय फलंदाज गारद केले. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेचा केवळ एक फिरकी गोलंदाज भारताच्या चार फिरकी गोलंदाजांना वरचढ ठरला.    

फिरकी खेळपट्टीचा दुराग्रह

गतवर्षी मुंबई कसोटीच्या आधी पुणे आणि बंगळूरु येथेही न्यूझीलंडविरुद्ध भारताने तीव्र फिरकीस साह्यभूत ठरतील अशा खेळपट्ट्या बनवल्या. पुण्यात मिचेल सँटनरने भारतीय फलंदाजीचे तीन-तेरा वाजवले. या संघांविरुद्ध फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या बनवण्याचे डावपेच अलीकडे भारतीय संघावरच उलटू लागले आहे. २०२१मध्ये इंग्लंडच्या संघाविरुद्ध चेन्नईमध्ये पराभूत झाल्यानंतर, २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुणे येथे पराभूत झाल्यानंतर पुढील सामन्यांमध्ये भारताने फिरकी गोलंदाजांसाठी नंदनवन खेळपट्ट्या बनवल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना नाचवले.

पण हा डाव २०२३मध्ये इंदूर येथे भारतीय संघाच्या अंगाशी आला. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना नाचवले. येथे एक पॅटर्न स्पष्टपणे दिसतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारताने फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या, कारण या दोन्ही संघांचा दर्जा वरचा आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघही आता कसोटी क्रिकेटमध्ये वरच्या दर्जाचे गणले जातात. पण त्याच्याविरुद्ध फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या बनवणे आपल्या अंगाशी येऊ लागले आहे. या वर्षाच्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुद्ध आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही व्यूहरचना हट्टाने राबवली गेली आणि ती अंगाशी आली. पण असे का घडत आहे?

सांघिक समतोलाशी तडजोड

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी प्रकारात आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता, मात्र त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणे कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये चमक दाखवता आली नाही हे मान्य करावेच लागेल. कारण कसोटी क्रिकेटमध्ये तो तसा बचावात्मक कर्णधार म्हणूनच ओळखला जायचा. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात त्याची कामगिरी सुमार राहिली. याउलट अनेकदा सामने किंवा मालिका गमावूनही विराट कोहलीच्या संघाने ‘सेना’ म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या देशांमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण केला. याचे कारण तो अनेकदा पाच गोलंदाज घेऊन उतरायचा.

दक्षिण आफ्रिकेतील एका सामन्यात तर चार वेगवान गोलंदाज अधिक हार्दिक पांड्या अशी ‘वेस्ट इंडियन’ करामत त्याने केली आणि सामनाही जिंकून दाखवला! याचे कारण जिंकण्यासाठी खेळायचे असल्यास एक फलंदाज कमी करून एक गोलंदाज वाढवावा लागेल असे त्याचे मत होते. पण गौतम गंभीर आणि शुभमन गिल जोडीने मात्र या समतोलाची व्याख्याच बदलून टाकली नि चार फिरकी गोलंदाज अधिक दोन वेगवान गोलंदाज खेळवले. वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यी चाल अखेर जुगारीच ठरली. कारण गिल जायबंदी ठरल्यामुळे भारताकडे मोजकेच फलंदाज शिल्लक राहिले. या सर्वांना मिळून पहिल्या डावात २०० आणि दुसऱ्या डावात १०० धावांची मजलही मारता आली नाही.

मुळातच ज्या संघाकडे जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव आहे, त्यांच्या जोडीला मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा आहेत अशा  संघाची गोलंदाजी या पृथ्वीतलावर कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही वातावरणात भेदकच ठरणार. याविषयी बाहेरच्यांना संदेह नाही, पण आम्हीच त्याविषयी साशंक आणि भेदरलेले राहिलो. हे भेदरलेपण पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रांचा अपवाद वगळता सतत दिसून आले. कारण आपल्याकडे ‘स्पेश्यालिस्ट’ फलंदाजच कमी होते. वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा हे अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्यांचे फलंदाजीतील योगदान प्रत्येक सामन्यात, प्रत्येक परिस्थितीत गृहित धरता येणार नाही.

फिरकीसमोर नैपुण्य इतिहासजमा!     

सध्याच्या झपाट्याने बदलत्या क्रिकेटमध्ये एक बदल ठळकपणे दिसू लागला आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. फिरकी गोलंदाजी खेळणारे सर्वोत्तम फलंदाज ही आपली ओळख इतिहासजमा होणे, हा तो बदल. त्यामुळे माँटी पानीसार, अजाझ पटेल, मोईन अली, आदिल रशीद, मिचेल सँटनर, नेथन लियॉन, सायमन हार्मर अशा विविध फिरकी गोलंदाजांसमोर अनेकदा आपण सपशेल नांगी टाकलेली दिसते. यांतील ऑस्ट्रेलियाचा नेथन लियॉन वगळता कुणीही जागतिक दर्जाचा आहे असे म्हणता येणार नाही.

कदाचित यात फ्रँचायझी क्रिकेटचा दोष असेल. चांगले फिरकी गोलंदाज निर्माण होत नाहीत असे नाही. पण फिरकी चांगल्या पद्धतीने खेळू शकतील असे तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याकडे फारसे दिसत नाहीत. पुन्हा हा बदल विराट कोहलीच्या काळापासून दिसू लागला आहे. कदाचित आयपीएलमधील अनुभवामुळे इतर संघ भारतीय फिरकी गोलंदाज आणि खेळपट्ट्यांच्या बाबतीत अधिक प्रशिक्षित होऊ लागलेत हेही कारण असेल. यामुळेच केवळ आणि केवळ, पहिल्या दिवसापासून फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्या बनवणे हे धोरण विजयाची हमी ठरत नसून सपशेल जुगार ठरू लागला आहे. आणि जुगारातील दान कधीही एकाच बाजूने पडत नसते!

siddharth.khandekar@expressindia.com