भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने शुक्रवारी रणजी चषक स्पर्धेमध्ये बंगालकडून खेळताना शतक झळकावलं. झारखंडविरोधात बंगळुरु येथे सुरु असणाऱ्या उप उपांत्यफेरीमधील सामन्यातील दुसऱ्या डावात मनोजने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे मनोज पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडामंत्री आहे. १५२ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने मनोजने शतक साजरं केलं.
पाचव्या दिवशी बंगालच्या संघाची धावसंख्या १२९ वर चार बाद अशी असताना मनोज मैदानामध्ये फलंदाजीसाठछी आला. मनोज आणि अभिषेक परोलने पाचव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. दोघेही मैदानावर थोडे स्थिर झालेले असतानाच शाहबाज नदीमने अभिषेकला ३४ धावांवर बाद केलं.
मनोजने शतक साजरं केल्यानंतर ३६ धावांची भर घालून म्हणजेच १३६ धावांवर बाद झाला. पहिल्या डावामध्ये बंगालने ७७३ धावांचा डोंगर उभा केला. सात गड्यांच्या मोबदल्यात एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर बंगालने डाव घोषित केला. सुदीप कुमार घरामी आणि अनुस्तप मुजूमदार यांनी शतकं झळकावली. तर बंगालच्या सात फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. यामध्येही मनोज तिवारीचा समावेश होता.
या धावसंख्येचा पाठलाग करताना झारखंडच्या संघाने पहिल्या डावात २९८ धाव केल्या. विराट सिंहने सर्वाधिक म्हणजे ११३ धावा केल्या.