वन-डे मालिकेपाठोपाठ भारताने न्यूझीलंडवर टी-२० मालिकेतही २-१ असा विजय संपादन केला. मात्र या विजयाचा भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीत आपलं स्थान सुधरवण्यासाठी फायदा झालेला नाहीये. मालिका विजयानंतरही भारताचा संघ आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम राहिलेला आहे. न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयामुळे क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला इंग्लंड आणि पाचव्या क्रमांकावर असलेला भारत यांचे ११९ असे समान गुण झाले आहेत. मात्र सरस कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला चौथं स्थान देण्यात आलेलं आहे.

भारताला या मालिका विजयाचा जराही फायदा झालेला नसला, तरीही भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. वन-डे आणि कसोटीत पाकिस्तानच्या संघाला सातत्य राखण्यात अपयश आलं असलं, तरीही टी-२० प्रकारात पाकिस्तान संघाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सध्या टी-२० क्रिकेटमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. गेल्या ७ सामन्यांपैकी पाकिस्तानने ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्यात देशात ३-१ अशी मात केल्यानंतर, World XI संघालाही पाकिस्तानने घरच्या मैदानावर २-१ असं हरवलंय. या सर्व विजयांचा पाकिस्तानला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी फायदा झालाय.

भारताने याआधी एकदाही न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवलं नाहीये. या पराभवानंतर न्यूझीलंड आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेनंतर आयसीसीने जाहीर केलेली ताजी क्रमवारी पुढीलप्रमाणे –

१) पाकिस्तान – १२४ गुण
२) न्यूझीलंड – १२० गुण
३) वेस्ट इंडिज – १२० गुण
४) इंग्लंड – ११९ गुण
५) भारत – ११९ गुण
६) दक्षिण आफ्रिका – ११२ गुण
७) ऑस्ट्रेलिया – १११ गुण
८) श्रीलंका – ९१ गुण
९) अफगाणिस्तान – ८६ गुण
१०) बांगलादेश – ७६ गुण