तुम्हाला माहिती आहे का, की भारताचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारताव्यतिरिक्त इतर देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. हो, २००३ च्या विश्वचषकानंतर असे घडले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी खेळला. मात्र त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या स्पर्धेनंतरच द्रविड स्कॉटलंडकडून खेळला. स्कॉटलंड क्रिकेटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. “जेव्हा एक जागतिक दर्जाचा फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड २००३ मध्ये स्कॉटलंडकडून क्रिकेट खेळला होता”, असे या ट्वीटमध्ये म्हटले गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विस्डेनच्या अहवालानुसार, द्रविडने स्कॉटलंडकडून खेळण्यासाठी २००३ मध्ये ३ महिन्यांसाठी ४५,००० पाऊंडचा करार केला होता. द्रविड त्यावेळी भारताचा उपकर्णधार होता. दिग्गज जॉन राइट भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. स्कॉटलंड संघ सचिन तेंडुलकरकडून प्रशिक्षण घेऊन इच्छित होता. स्कॉटिश क्रिकेट युनियनचे प्रमुख ग्वेन जोन्स यांनी तेंडुलकरला पाठवण्यासाठी राईट यांच्याशी संपर्क साधला. परंतु राइट यांनी द्रविडला ही ऑफर दिली. द्रविडने हे आव्हान स्वीकारले आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी इंग्लंडला गेला जिथे त्याने अकरा वनडे सामने खेळले. हे सर्व सामने वेगवेगळ्या काउंटी संघांविरुद्ध होते.

हेही वाचा – End Of An ERA..! डिव्हिलियर्समधून क्रिकेट निवृत्त; भावूक नेटकरी म्हणाले, “आम्ही तुला…”

द्रविडने हॅम्पशायरविरुद्ध पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने ४१ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याच्या बॅटमधून खूप धावा निघाल्या. त्याने सॉमरसेटविरुद्ध शतक झळकावले आणि त्यानंतर नॉटिंगहॅमशायरविरुद्ध नाबाद १२९ धावांची खेळी केली.

याशिवाय द्रविड पाकिस्तानविरुद्ध स्कॉटलंडच्या दौर्‍याच्या सामन्यातही खेळला होता. मात्र या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. स्कॉटलंडसाठी ११ सामन्यांमध्ये द्रविडने ६६.६६ च्या सरासरीने आणि ९२.७३ च्या स्ट्राइक रेटने ६०० धावा केल्या. नॅशनल क्रिकेट लीगमध्ये द्रविडने स्कॉटलंडसाठी ३ शतके आणि २ अर्धशतके झळकावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know this rahul dravid played cricket for scotland adn