वृत्तसंस्था, बंगळूरु

मध्य विभागाच्या संघाने दक्षिण विभागाविरुद्धच्या अंतिम लढतीत विजयाची औपचारिकता पूर्ण करताना ११ वर्षांनी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. दक्षिणने दिलेले ६५ धावांचे माफक लक्ष्य मध्य विभागाने चार गड्यांच्या मोबदल्यात गाठले. काही महिन्यांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ‘आयपीएल’ जिंकवून देणाऱ्या रजत पाटीदारचे कर्णधार म्हणून हे सलग दुसरे जेतेपद ठरले.

दक्षिणचा पहिला डाव १४९ धावांत आटोपल्यानंतर मध्य विभागाने ५११ धावांची मजल मारत सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट केला होता. दुसऱ्या डावात दक्षिण विभागाच्या फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा केली. विशेषत: पुद्दुचेरीचा अंकित शर्मा (९९) आणि तमिळनाडूचा आंद्रे सिद्धार्थ (नाबाद ८४) यांनी दिलेला लढा उल्लेखनीय ठरला. मात्र, दक्षिण विभागाचा दुसरा डाव ४२६ धावांत आटोपला आणि मध्यला विजयासाठी केवळ ६५ धावांचे आव्हान मिळाले.

सोमवारी, सामन्याच्या अखेरच्या पाचव्या दिवशी मध्यचा संघ हे आव्हान सहजपणे गाठेल असा अंदाज होता. मात्र, दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मध्यच्या फलंदाजांची कसोटी पाहिली. डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग आणि डावखुरा फिरकीपटू अंकित शर्मा यांनी मध्यच्या फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी झगडायला लावले. यात मध्यने चार फलंदाजही गमावले. परंतु अक्षय वाडकर (नाबाद १९) आणि यश राठोड (नाबाद १३) या विदर्भाच्या फलंदाजांनी मध्य विभागाचा विजय सुनिश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

● दक्षिण विभाग (पहिला डाव) : १४९

● मध्य विभाग (पहिला डाव) : ५११

● दक्षिण विभाग (दुसरा डाव) : ४२६

● मध्य विभाग (दुसरा डाव) : २०.३ षटकांत ४ बाद ६६ (अक्षय वाडकर नाबाद १९, यश राठोड नाबाद १३, रजत पाटीदार १३; गुरजपनीत सिंग २/२१, अंकित शर्मा २/२२)