England Playing XI IND vs ENG 3rd Test: भारत वि. इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या १० जुलैपासून ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत-इंग्लंड मालिकेतील हा तिसरा कसोटी सामना असून इंग्लंडने पहिला सामना तर दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला आहे. यासह भारत आणि इंग्लंड मालिकेत १-१ असे बरोबरीत आहेत. दरम्यान भारताविरूद्ध तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.

भारत-इंग्लंड मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसरा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटीसाठी संघात खूप मोठे बदल केले आहेत. तिसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधीच इंग्लंड संघाने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. संघात एक बदल करण्यात आला आहे, जो आधीच अपेक्षित होता.

इंग्लंड संघाने उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे. जोफ्रा आर्चर दुसऱ्या सामन्यापूर्वीच संघात सामील झाला होता. पण तो दीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन करत असल्याने खबरदारी म्हणून त्याला प्लेईंग इलेव्हनबाहेर ठेवण्यात आले होते. पण आता तो पुनरागमन करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे आणि तिसरा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. जोफ्रा आर्चर ४ वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन करत आहे.

दुखापतीपूर्वी जोफ्रा आर्चरने भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. २०१९ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने फेब्रुवारी २०२१ मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला. आता योगायोगाने जोफ्रा सुमारे साडेचार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरूद्ध सामन्यातूनच पुनरागमन करत आहे. इंग्लंडसाठी आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळलेल्या जोफ्राने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंगच्या जागी जोफ्रा आर्चरला संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय इंग्लंडच्या ताफ्यात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

इंग्लंडची भारताविरूद्ध लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर